जालना : महाराष्ट्रात बलात्काराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. पुणे, अमरावती, उल्हासनगर येथील अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या घटना तसेच मुंबईतील निर्भया हत्याकांडासारखी भयानक घटना ताजी असताना जालना जिल्हा देखील बलात्काराच्या घटनेने हादरला आहे. जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यात अवघ्या 12 वर्षांच्या मुलीवर शेजारी राहणाऱ्या 65 वर्षीय नराधमाने बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. पण या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
बदनापूर तालुक्यातील एका गावात मंगळवारी (14 सप्टेंबर) दुपारी पीडित मुलगी घरासमोर एकटी कोंबड्यांना दाणे टाकत होती. यावेळी तिच्या घरात इतर सदस्य नव्हते. याच गोष्टीची संधी साधून बाजूच्या शेतात राहणाऱ्या आरोपी अनवर खान याने मुलीला जबरदस्ती आपल्या घरात नेलं. तिथे तिच्यावर अमानुषपणे बलात्कार केला. पीडित मुलीने शेतात काम करणाऱ्या आपल्या आईला ही हकीकत सांगितल्याने मुलीच्या आईने बदनापूर पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार दिली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्याला रात्री उशिरा अटक करण्यात आली. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.