मुंबई, दि. १६ : खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी आलेल्या शेकडो श्री सदस्यांना उन्हाचा त्रास होऊन भोवळ आल्याच्या घटना घडल्या. त्यात ११ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली.त्रास झाल्याने त्यांना रुग्णालयात हलवावे लागले मात्र दुर्दैवाने त्यातील अकरा जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
महाराष्ट्र भूषण सोहळा दरम्यान घटना
अनेकांनी भर उन्हात कार्यक्रम ऐकला आणि नंतर थंड पाणी पिणे सरू केले. त्यातून त्यांना उष्माघाताचा त्रास सुरू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अत्यवस्थ श्री सदस्यांना कामोठे एमजीएम रुग्णालयासह खारघर मधील टाटा हॉस्पिटल व नवी मुंबई मधील वेगवगेळ्या रुग्णालयात दाखल खाण्यापिण्याची व्यवस्था केली होती, त्याच ठिकाणी नंतर त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले.मात्र ११ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला
मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख मदत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने रुग्णालयांना भेटी दिल्या. मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपये याची मदत त्यांनी जाहीर केली. जे लोक रुग्णालयात उपचार घेत आहेत त्यांच्यावरचा सर्व खर्च सरकार करेल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
उष्माघातामुळे श्री सदस्यांचा झालेला मृत्यू वेदनादायी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित काही श्री सदस्यांना उष्माघातामुळे रुग्णालयात हलवावे लागले. दुर्दैवाने त्यातील अकरा जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. मी या श्री सदस्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ही अतिशय वेदनादायी आणि दुर्दैवी घटना आहे. राज्य शासनातर्फे मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येणार असून रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या श्री सदस्यांचा उपचाराचा खर्च शासनामार्फत केला जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले.
कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या श्री सदस्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे रात्री आठच्या सुमारास आले होते. मुख्यमंत्र्यांनी उपचार घेत असलेल्या रुग्णांशी संवाद साधला. त्याचबरोबर तेथील डॉक्टर्ससोबत चर्चा करून उपचाराबाबत माहिती घेतली.
यावेळी माध्यम प्रतिनीधींशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, उष्माघाताचा त्रास झाल्याने श्री सदस्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. सोहळ्याच्या ठिकाणी असलेल्या डॉक्टरांनी काही श्री सदस्यांवर प्राथमिक उपचार केले. काहींना रुग्णालयात हलवावे लागले. एमजीएम रुग्णालयात दाखल असलेले रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या समन्वयासाठी पनवेल महापालिकेचा उपायुक्त दर्जाचा अधिकारी नियुक्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रुग्ण आणि नातेवाईकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.