मुंबई: महाराष्ट्रातील विरोधी पक्षाचे आमदार फोडून, एका रात्रीत राष्ट्रपती राजवट हटविल्याची घोषणा करून घाईघाईनं आपल्या सरकारच्या शपथविधी करण्याच्या भाजपच्या राजकारणावर काँग्रेसनं जोरदार हल्ला चढवला आहे. ‘भाजपनं देशातील लोकशाहीची सुपारी घेतली आहे,’ असा घणाघात काँग्रेसनं केला आहे.
राज्यात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांचं सरकार येणार असं वाटत असतानाच भाजपनं आज अचानक मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रिपदाचा शपथविधी घडवून आणला. राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार यांच्यासह काही आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा करत भाजपनं सरकार स्थापनेचा दावा केला आणि एका रात्रीत राज्यपालांनी तो मान्य करून देवेंद्र फडणवीस यांना शपथही दिली. या घडामोडींमुळं राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी या संपूर्ण प्रकरणावर अत्यंत तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. ‘राज्यपाल हे अमित शहा यांचे ‘हिटमॅन’ असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.














