नंदुरबार – राज्यात सुरु असलेल्या सत्तानाट्याच्या घडामोडी पाहता जिल्ह्यातील एक आमदार राजीनामा देवून इतर पक्षातून पुन्हा उमेदवारी करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सध्या ऐकायला मिळत आहे. हे आमदार कोण? तेे कोणत्या पक्षाचे? ते राजीनामा का देणार? त्यांना मंत्रीपद मिळणार काय? असे विविध प्रश्न यानिमित्त उपस्थित करण्यात येत आहेत.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत नंदुरबार जिल्ह्यात चार आमदार निवडून आले आहेत. यात दोन काँग्रेस तर दोन भाजपा आमदारांचा समावेश आहे. यातील दोन आमदार नवखे आहेत. तर उर्वरित दोन्ही आमदार सहा व सातवेळा निवडून आलेले आहेत.
राज्यात भाजपा-सेनेने एकत्रित निवडणूक लढवून अनुक्रमे 105 व 56 जागा मिळविल्या आहेत. दोघा पक्षांना स्पष्ट बहुमत मिळाले होते. त्यामुळे युतीचे सरकार पुन्हा सत्तेत येणार होते. परंतू, शिवसेनेने मुख्यमंत्रिपदाची मागणी करुन भाजपासमोर पेच उभा केला.
भाजपाला शिवसेनेशिवाय सत्ता स्थापन करणे अशक्य होते. त्यामुळे त्यांनी दावा केला नाही. त्यानंतर शिवसेनेने सत्ता स्थापनेचा दावा केला. यासाठी त्यांनी राज्यपालांकडून मुदतवाढ दिली नाही.
त्यामुळे तेही सत्ता स्थापन करू शकले नाही. परिणामी आता काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना अशी महाशिवआघाडी करून सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. त्यामुळे येत्या दोन-तीन दिवसात सत्ता स्थापन होण्याची शक्यता आहे.
सत्तास्थापनेच्या या घडामोडी पाहता नवीन सरकार स्थापन झाल्यास नंदुरबार जिल्ह्यातील एक आमदार राजीनामा देवून इतर पक्षातून पुन्हा निवडणूक लढविणार असल्याची जोरदार चर्चा सध्या जिल्ह्यात सुुरू आहे.
इतर पक्षातून निवडून आल्यानंतर त्या आमदाराला मंत्रीपद मिळणार असल्याचेही बोलले जात आहे. संबंधीत आमदार हे त्या पक्षाच्या अध्यक्षांना भेटून आल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे हे आमदार कोण? हा प्रश्न उपस्थित होत आहे.














