मुंबई: मुख्यमंत्री यांनी ५०-५०च्या फॉर्म्युल्यावरून शब्द फिरवल्याने उद्धव ठाकरे आक्रमक झाले आहेत. मुख्यमंत्री शब्द फिरवत असतील तर बैठकीत कशावर चर्चा करायची? असा सवाल करत उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना-भाजपची मंत्रिमंडळ स्थापन्याबाबतची होणारी बैठक रद्द केली आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये मुख्यमंत्रिपदावरून तणाव निर्माण झाला आहे.
शिवसेना नेते आणि खासदार राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन ही बैठक रद्द झाल्याचं जाहीर केलं. भाजपचे केंद्रातील दोन नेते आणि शिवसेनेचे दोन ज्येष्ठ नेते आज मंत्रिमंडळाबाबत चर्चा करणार होते. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा शब्द फिरवला. फिफ्टी-फिफ्टीचा फॉर्म्युलाच ठरला नसल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केलं. मुख्यमंत्रीच जर शब्द फिरवत असतील तर चर्चेसाठी उरलंच काय? मग बैठक कशाला हवी? असा सवाल संजय राऊत यांनी केला. काही तरी ठरल्याशिवाय लोकसभा आणि विधानसभेत युती कशी झाली? काही तरी ठरलंच असेल ना? काहीही न ठरता युती होईलच कशी, याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावं, असं आव्हानही राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना केलं.














