पुरंदर : पुरंदर तालुक्यातील सासवड वीर रस्त्याच्या कडेला असलेले झाड अंगावर पडल्याने परिंचे येथील नवविवाहित जोडप्यासह त्यांच्या भाचीचाही मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडलीय. रेणुकेश जाधव आणि सारिका जाधव असं नवविवाहित जोडप्याचं तर ईश्वरी देशमुख असं त्या दुर्दैवी मृत्यू झालेल्या भाचीचं नाव आहे. रेणुकेश आणि सारिका यांचा चार महिन्यापूर्वीच विवाह झाला आहे. या दुर्देवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत असे की, काल सासवड वीर रस्त्यावर काल रात्री वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला. यावेळी रेणुकेश जाधव आणि त्यांची पत्नी सारिका जाधव हे दोघे त्यांची भाची ईश्वरी देशमुखला घेऊन सासवडहून परिंचेकडे मोटार सायकलवर निघाले होते. संध्याकाळी सात वाजलेच्या सुमारास पिंपळे येथून जात असतांना रस्त्या शेजारील अर्धवट जळलेले वडाचे झाड त्यांच्या अंगावर कोसळले. यामध्ये रेनुकेश व सारिका यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेत त्यांची भाची गंभीर जखमी झाली. घटनेनंतर परिसरातील नागरिक मदतीला धावले. यानंतर पोलिसानी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्तांना सासवड येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. मात्र आधीच रेणुकेश आणि सारीका या दोघांचा मृत्यू झाला होता. तर ईश्वरी देशमुख बेशुध्द अवस्थेत असल्याने तिला पुढील उपचारासाठी पुणे येथे पाठवण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान ईश्वरीचा देखील मृत्यू झाला.















