औरंगाबाद – औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसला आहे. कारण भाजपचे माजी शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांच्यासह माजी महापौर गजानन बारवाल यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत तनवाणी आणि बारवाल यांनी मातोश्रीवर शिवबंधन बांधले. दरम्यान किशनचंद तनवाणी यांची ही घरवापसी ठरली. तनवाणी हे मूळचे शिवसेनेचेच आहेत. शिवाय ते शिवसेनेचे आमदारही होते. मात्र काही कारणास्तव त्यांनी शिवसेनेला रामराम ठोकला होता.
राज्यात महाराष्ट्र विकासआघाडी सरकार आल्यानंतर स्थानिक राजकारणातही बदलाचे वारे वाहू लागले आहेत. ग्रामपंचायत, महापालिका, नगरपरिषदा, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणूक यासारख्या स्थानिक पातळीवर पक्षांतर होत आहे. त्यात आता औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपला धक्का बसला आहे.
भाजप-मनसेचा स्वबळाचा नारा
एप्रिल 2020 मध्ये औरंगाबाद महापालिकेची निवडणूक होणार आहे. त्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना एकत्रित निवडणुकीला सामोरे जाण्याच्या तयारीत आहे. तर मनसे आणि भाजप स्वबळावर ही निवडणूक लढवणार आहे. या पक्षांपुढे एमआयएमचे सुद्धा आव्हान आहे.














