मुंबई – राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेना-राष्ट्रवादीचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मनात खदखद दिसत आहे. शिवसेना-राष्ट्रवादीचे अनेक निष्ठावंत आमदार मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज आहेत. दरम्यान शिवसेना-राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मनसेचा झेंडा हाती घेण्याचा निर्णय घेतला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना-राष्ट्रवादीच्या शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केला.
स्थानिक नेत्यांची मनमानी, मान-सन्मान किंवा पद मिळत नाही, वरिष्ठ नेत्यांसमोर समस्या मांडूनही होणारे दुर्लक्ष यासारख्या कारणांमुळे शिवसेना-राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मनात खदखद होती. अखेर ती पक्षांतराच्या रुपाने बाहेर पडली. पक्षांतर करणाऱ्यांमध्ये रायगडमधील पेण, मुरुड भागातील कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. याशिवाय विविध शहरं, तालुक्यांतील पदाधिकाऱ्यांनीही मनसेची वाट धरली आहे.















