पाथर्डी वगळता अन्य नावे फायनल ग्रामपंचायत विभागाकडून लपवालपवी
अहमदनगर – दरवर्षी वादाच्या भोवर्यात असणार्या जिल्हास्तरीय आदर्श ग्रामसेवक पुरस्कारांची परंपरा यंदाही कायम राहिली. जिल्ह्यात ग्रामीण भागात उत्कृष्ट काम करणार्या 2016-17 आणि 2017-2018 या वर्षातील ग्रामसेवकांचा सन्मान करण्यास जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाला 2019 उजाडला असून तरी देखील कार्यक्रमाच्या दोन दिवस आधीपर्यंत ग्रामपंचायत विभागाला या दोन्ही वर्षातील सन्मान करणार्या ग्रामसेवकांची यादी अंतिम करता आली नव्हती. मात्र, शुक्रवारी सायंकाळी उशीरा पुरस्कारार्थीची नावे अंतिम करण्यात आली असून या दोन्ही वर्षातील पाथर्डीतील पुरस्कारार्थींची नावे टाळण्यात आलेली आहेत. दरम्यान, शनिवार आणि रविवारी सुट्टी असल्याने आता ऐनवेळी पुरस्कार प्राप्त ग्रामसेवकांना सोहळ्यासाठी बोलावण्यात येणार आहे.
जिल्ह्यात 2016-17 आणि 2017-2018 या वर्षात उत्कृष्ट काम करणार्या ग्रामसेवकांचा जिल्हास्तरीय आदर्श ग्रामसेवक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम सोमवारी सकाळी होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षा शालीनीताई विखे पाटील राहणार असून यावेळी उपाध्यक्षा राजश्रीताई घुले, यासह सभापती आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी पाटील यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. मात्र, शुक्रवारी सायंकाळी उशीरापर्यंत पुरस्कारार्थी ग्रामसेवकांची नावे अंतिम करण्यास ग्रामपंचायत विभागाला यश आले नव्हते. याबाबत संबंधीत अधिकारी आणि कर्मचार्यांना वारंवार संपर्क केल्यानंतर त्यांनी यादी अंतिम झाली नसल्याचे सांगितले.
याबाबत वरिष्ठ अधिकार्यांची संपर्क साधला असता उपयोग झाला नाही. मात्र, माध्यमामध्ये कार्यक्रम आणि पुरस्कारार्थीची नावे अंतिम झाल्याची माहिती पोहचताच ग्रामपंचायत विभाग हादरला आणि शुक्रवारी सायंकाळी पुरस्कारार्थीची यादी प्रसिध्द केली. दरम्यान, या कार्यक्रमाबाबत जिल्हा परिषद अनभिज्ञ असल्याचे समोर आले. यामुळे यंदा देखील कार्यक्रमात गोंधळ असल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
दरम्यान, या पुरस्काराच्या निवडीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती असून यात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रकल्प अधिकारी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, ग्रामंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि ग्रामसेवकांचा प्रतिनिधी यांचा समावेश आहे. या समितीने या दोन वर्षातील 13 तालुक्यातील ग्रामसेवकांची निवड अंतिम केलेली आहे. मात्र, पाथर्डी तालुक्यातून आलेल्या पुरस्कारार्थीच्या नावावर तक्रारी आल्याने या तालुक्याची नावे अंतिम होवू शकलेली नाहीत. यामुळे शुक्रवारी उशीरापर्यंत गोंधळाचे वातावरण होते. याबाबत ग्रामपंचायत विभागाकडे विचारणा केल्यानंतर पुस्कारार्थीच्या नावाची लपवालपवी सुरू असल्याचे समोर आले.














