अहमदनगर (प्रतिनिधी) – जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता पद भरती व बृहन्मुंबई महानगरपालिका कनिष्ठ अभियंता भरतीच्या परीक्षा एकाच दिवशी आल्याने उमेदवारांसमोर पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे या दोन्ही परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्याच्या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसने राज्यपालांना पाठवले आहे.
महाराष्ट्र सरकारच्या जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता भरती-2019ची 504 पदांसाठीची परीक्षा 25 व 26 नोव्हेंबरला होणार आहे तर तर बृहन्मुंबई महापालिका कनिष्ठ अभियंता भरती-2019ची 243 पदांसाठीची परीक्षा आयबीपीएस या संस्थेद्वारे 25 नोव्हेंबरला होणार आहे. या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी व राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवर होणार असल्याने विद्यार्थ्यांसमोर अडचण निर्माण झाली आहे.
या भरतीसाठी गेल्या दोन-तीन वर्षांसाठी ग्रामीण भागातील विद्यार्थी अत्यंत बिकट परिस्थितीत अभ्यास करतात. या परीक्षा एकत्रित आल्याने अनेक विद्यार्थ्यांना या परीक्षेस मुकावे लागणार आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. स्थापत्य विषयात पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना ही कदाचित शेवटची संधी असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची ही गैरसोय टाळावी म्हणून राज्यपालांनी हस्तक्षेप करावा व दोन्हीपैकी एका परीक्षेचे वेळापत्रक बदलावे यासाठी नगर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार व कार्याध्यक्ष संजय कोळगे यांनी राज्यपालांना निवेदन पाठवले आहे.















