नागपूर- राज्यातील सत्ता स्थापनेचा पेच अद्याप सुटलेला नाही. भाजप-सेना यांच्यात सुरू असलेला संघर्ष थांबवण्यासाठी आता सरसंघचालक मोहन भागवत यांनी त्यांच्या भाषणातून अप्रत्यक्ष सल्ला दिला आहे. नागपूरमध्ये एका कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी सांगितले की, माणसाचा वाढणारा स्वार्थ पाहता चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले- “देशाचे उदाहरण घ्या किंवा कोण्या एका व्यक्तीचे, सर्वांना माहिती स्वार्थ खूप वाईट आहे, पण हा स्वार्थ कोणी सोडायला तयार नाही.” भागवत यांच्या या वक्तव्याचा संबंध राज्यातील सध्याच्या स्थितीशी जोडला जात आहे. पुढे ते म्हणाले की, “सर्वांना माहिती आहे आपआपसांत वाद केल्यानं दोघांचही नुकसान होत आहे. मात्र कोणीही वाद सोडण्यासा तयार नाही. स्वार्थामुळे नुकसान होतं मात्र तो सोडायला कोणी तयार नाही. हे तत्व सर्वांना लागू आहे. मग तो व्यक्ती असो किंवा देश.”















