नवी दिल्ली- राज्यातला सरकारस्थापनेचा तिढा अजून सुटलेला नाही. शिवसेना, भाजप या दोन्ही पक्षांना मिळून बहुमत असूनही सरकारस्थापनेचा दावा भाजपने केलेल नाही. मुख्यमंत्रीपदावरून दोहोंमध्ये एकमत होताना दिसत नाही. या पार्श्वभूमीवर तिकडे दिल्लीत आणखी वेगळ्या घडामोडी घडत आहेत. आज सकाळी अचानक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री गडकरीं यांच्या निवासस्थानी पोहोचल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. अहमद पटेल हे काँग्रेसचे चाणक्य मानले जातात. त्यामुळेच या भेटीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे हेदेखील आज मुंबईत आहेत.
गडकरी यांच्या निवासस्थानी झालेली ही भेट सुमारे तासभर चालली. बाहेर येताच अहमद पटेल यांच्यावर प्रसारमाध्यमांनी प्रश्नांचा भडीमार केला. मात्र ‘आपण देशातल्या शेतीच्या प्रश्नावर गडकरी यांना भेटलो. महाराष्ट्राच्या राजकारणावर या बैठकीत काहीही चर्चा झालेली नाही,’ असे ते म्हणाले. नितीन गडकरी हे केंद्रीय परिवहन मंत्री असताना पटेल यांनी शेतीच्या प्रश्नावर काय चर्चा केली हा प्रश्न गुलदस्तातच आहे. त्यामुळेच ही भेट महाराष्ट्रातल्या सरकारस्थापनेसंदर्भातल्या पेचाशीच संबंधित होती, असे जाणकारांचे मत आहे. राज्यातल्या सत्ता स्थापनेपासून कॉंग्रेसने दूर रहावे, शिवसेनेला कोणताही पाठींबा देऊ नये, अशी चर्चा नितीन गडकरी व अहमद पटेल यांच्यात झाल्याचीही चर्चा आहे.















