मुंबई,- केवळ खुर्चीच्या लालसेपोटी स्वतःला वाघ म्हणवणारे मुख्यमंत्री हे आता पवारांच्या ताटाखालचं मांजर झाले आहेत अशी टीका भाजपानं केली असून एकाच सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी आणि शिवसेना यांना वेगवेगळे न्याय आणि नियम आहेत का?असा खडा सवाल भाजपनं ट्विट करत सोशल मीडियातून केला आहे.गृहमंत्र्यांच्या बाबतीत ‘लेटर बॉम्ब’धमाका उडाल्याअसून भाजपनं महाविकास आघाडीवर टिकेचा घणाघात सूरूच ठेवला आहे.
दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी काल पत्रकार परिषद घेऊन परमवीर सिंह यांनी मुख्यमंत्री यांना पाठवलेल्या ‘त्या’ पत्रावर अनेक प्रश्न उपस्थित करत गृहमंत्री यांना ‘क्लीन चिट’ दिली होती व अनिल देशमुख हे दवाखान्यात व विलगीकरणात होते असा दावा केला होता.यानंतर भाजपाने पत्रकार परिषदेचे व्हिडीओ,विमान प्रवास कागदपत्र समोर आणून पवारांच्या दाव्यांना उत्तर दिल आहे.
कधी महावसुली आघाडी, कधी आकार्यक्षम सरकार म्हणून ठाकरे सरकारवर भाजपनं टीकेची झोड उठवली आहे. तर दुसरीकडे मुनगंटीवार यांनी कालच पत्रकार परिषद घेऊन राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी राज्यपाल यांनी शिफारस करावी अशी मागणी लावून धरली आहे.
ज्यांनी ‘लेटर बॉम्ब’ टाकून गृहमंत्र्यांवर आरोप केले आहे ते तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी मे.सर्वोच्च न्यायालयात धाव घेत न्यायालयीन लढाई लढत सुरु केली आहे.विरोधक चहूबाजूनी आघाडी सरकारवर घणाघात करत आहे.ठिकठिकाणी भाजप आंदोलन करत आहे, विरोधकांच्या या टिकेला आघाडी सरकार कसे सामोरे जाईल, विरोधकांना परतवून लावण्यात आघाडी सरकार आता काय दिशा ठरवते याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.















