जामनेर प्रतिनिधी । सर्व कुटुंबीय गाढ झोपेत असताना दाराला बाहेरून कडी लावली घरासमोरच असलेल्या निंबाच्या झाडाला गळफास घेवून तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जामनेर तालुक्यातील पहूर येथे घडली. या घटनेने घरातील सदस्यांना धक्का बसला असून कुटुंबियांनी एकच हंबरडा फोडला. दरम्यान, याबाबत पहूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर असे की, नारायण त्र्यंबक उबाळे नामक तरूण गॅरेज व्यवसायासह ट्रॅक्टर रोटावेटर चालविण्याचे काम करीत होते. बुधवारी रात्री ते ट्रॅक्टर रोटावेटरच्या कामासाठी दुसऱ्याच्या शेतावर गेले होते. शेतातील काम आटोपून रात्री २ वाजेच्या सुमारास ते घरी आले. सर्व कुटुंबीय गाढ झोपेत असताना नारायण उबाळे यांनी घराच्या बाहेर येऊन दाराला बाहेरून कडी लावली आणि समोरच असलेल्या निंबाच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली.
नेहमीप्रमाणे मयत नारायण उबाळे यांची वहिनी भावना उबाळे सकाळी ५.३० वाजेच्या सुमारास उठल्या आणि दार उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र दाराला बाहेरून कडी लावलेली असल्याने त्यांनी दरवाजा जोरात ठोठावला. त्यांच्या या प्रयत्नात दरवाजाला बाहेरून असलेली दरवाजाची कडी उघडली गेली. दिराला अशा अवस्थेत पाहून भावना यांनी आरोळ्या मारल्या.
घरातील सर्व कुटुंबियांनी एकच हंबरडा फोडला. घटनास्थळी पोलीसांनी धाव घेवून पंचनामा केला. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत नारायणच्या पश्चात आई, वडील, भाऊ, वहिनी असा परिवार असून मयत नारायणचा काही दिवसांपूर्वीच घटस्फोट झाला होता.