नागपूर – राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी शेतकऱ्यांना कोठेही वणवण फिरावे लागणार नाही. यासाठी काय करायचे याची माहिती त्यांना देण्यासाठी आम्ही एक माहितीपट बनवणार आहोत. हा माहितीपट राज्याच्या ग्रामीण भागात दाखवला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी दिली. तसेच १० रुपयात थाळी देण्यासाठी राज्यात ५० ठिकाणी शिवभोजन थाळी सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
विधिमंडळाचे कामकाज संपल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अर्थमंत्री जयंत पाटील, काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण, नितीन राऊत आणि अन्य आमदारांसोबत पत्रकारांशी संवाद साधला. उद्धव ठाकरे म्हणाले, राज्याच्या ग्रामीण भागातील जनतेला आपल्या अडचणी घेऊन मुंबईत मंत्रालयात यावे लागते. तेथे येऊन त्यांना हेलपाटे घालावे लागतात. ग्रामीण भागातील नागरिकांचे हेलपाटे वाचावेत आणि त्यांच्या जागीच त्यांच्या समस्यांचे निराकरण व्हावे यासाठी प्रत्येक जिल्ह्यात मुख्यमंत्री कार्यालय स्थापन करण्यात येईल. नागरिकांनी त्यांच्या समस्या या कार्यालयात द्याव्यात. ही कार्यालये मुंबईतील मुख्यमंत्री कार्यालयाशी संलग्न असतील आणि नागरिकांच्या समस्या थेट आमच्याकडे येतील.
समृद्धी महामार्गाच्या बाजूला कृषी समृद्धी केंद्राची उभारणी
मुख्यमंत्री म्हणाले, विदर्भातील जनतेचे प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करणार असून पूर्व विदर्भात स्टील प्लँट उभा केला जाईल. कोणत्याही सिंचन प्रकल्पांना स्थगिती देणार नाही. नादुरुस्त कालवे दुरुस्त करून सिंचन प्रकल्प पूर्णत्वास नेले जातील. समृद्धी महामार्गाच्या बाजूला कृषी समृद्धी केंद्र उभारले जातील, असेही त्यांनी सांगितले. या वेळी मंत्री जयंत पाटील म्हणाले, कर्जमाफीसाठी कोणत्याही शेतकऱ्याला ६४ रकान्यांचा कोणताही अर्ज भरावा लागणार नाही तसेच त्याला आपल्या पत्नीलाही कोठे घेऊन जावे लागणार नाही. त्याला फक्त बँकेत जाऊन त्याच्या खात्याची ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड दाखवावे लागेल. शेतकऱ्याला वणवण फिरावे लागू नये याची आम्ही पूर्ण काळजी घेऊ, असेही त्यांनी सांगितले.
















