नाशिक – अहमदनगर जिल्ह्यातील शेवगांव येथील आबासाहेब काकडे कॉमर्स फाऊंडेशनच्या अभ्यास मंडळावर नाशिक येथील प्रा. डॉ. कृष्णा शहाणे, प्रा. राजेंद्र शहाणे व प्रा. परेश सांगवीकर यांची निवड झाली आहे.
आबासाहेब काकडे शैक्षणिक संस्थेच्या शैक्षणिक समूहासाठी कॉमर्स फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली आहे. त्या अंतर्गत विविध विषयांचा अभ्यासक्रम ठरविला जातो. यात गोखले शिक्षण संस्थेच्या बिटको महाविद्यालय नाशिकरोड येथील अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. कृष्णा शहाणे हे ‘भारतीय शेती आणि आर्थिक विकास’, ‘एकात्मिक ग्रामीण विकास’ या विषयांचा, बीवायके कॉलेजचे प्रा. परेश सांगवीकर हे ‘पुस्तक पालन आणि लेखाकर्म’, ‘चिटणीसाचा व्यवसाय’, ‘व्यापार संघटन’ या विषयांचा तर एस. एस. धामणकर महाविद्यालयाचे प्रा. राजेंद्र शहाणे हे ‘भारतीय बँकिंग व्यवसाय’, ‘भारतीय सहकार चळवळ’ या विषयांचा स्वतंत्ररित्या अभ्यासक्रम तयार करणार आहेत. यापूर्वी, डॉ. कृष्णा शहाणे यांनी संदीप अभिमत विद्यापीठाच्या अर्थशास्त्र अभ्यास मंडळावर काम केले आहे.















