पंढरपूरः – वसंत पंचमी म्हणजे अर्थातच वसंताचा म्हणजेच निसर्गाचा उत्सव. तो सतत सुंदर भासणारा निसर्ग, वसंत ऋतूत सोळा कलांनी खुलतो. याच मुहूर्तावर साक्षात परब्रह्म विठ्ठल आणि जगन्माता रखुमाईचा विवाहसोहळा संपन्न झाला. या शाही विवाहाची धामधूम पंढरपुरात सकाळपासूनच सुरू झाली होती. देवाच्या विवाहसोहळ्याला हजेरी लावण्यासाठी राज्यभरातून हजारो भाविकांनी पंढरीत गर्दी केली होती.
भरजरी पैठणी आणि करवतकाठी धोतर
लग्नवधू अर्थात जगत्जननी रुक्मिणी मातेला पांढरी भरजरी पैठणी नेसविण्यात आली होती. तर, नवरदेव विठुरायाला पांढरे शुभ्र करवतकाठी धोतर, पांढरी अंगी आणि पांढरी पगडी घालण्यात आली होती. देवाचे गाभारे आकर्षक गुलाब, ऑर्चिड आणि अन्य फुलांनी अतिशय आकर्षक पद्धतीने सजवण्यात आले होते. वसंत पंचमी असल्याने श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या मूर्तीवर फुलांपासून तयार करण्यात आलेल्या गुलालाची उधळण करण्यात आली.














