नवी दिल्ली – मंदीला रोखण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न करणारे केंद्र सरकार आगामी अर्थसंकल्पात करदात्यांना सुखद धक्का देण्याच्या तयारीत आहे. कंपनी कर कमी केल्यानंतर आयकर कपातीची मागणी जोर धरत असून सरकारने आयकर कमी करण्याबाबत हालचाली सुरु केल्या आहेत. त्याशिवाय सध्याच्या कर संरचनेत बदल करून अधिक उत्पन्न असणाऱ्या वेतनधारकांसाठी नवा कर स्तर जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. केंद्रात अर्थसंकल्प तयारीला सुरुवात झाली आहे. मागील अर्थसंकल्पात आयकरात कोणताही बदल झाला नव्हता. त्यामुळे यंदा कर कपातीची दाट शक्यता आहे.
अर्थव्यवस्था सुस्तावलेली आहे. बाजारातील वस्तूंचा खप वाढवण्याची ग्राहकांच्या हाती पैसा शिल्लक राहणे आवश्यक आहे. त्यावर उपाय म्हणून आयकरात कपात केली जाऊ शकते असं सूत्रांनी म्हटलं आहे. दरम्यान, एका वरिष्ठ अधिकाऱ्याने यावर म्हटलं आहे की, कोणताही राजकीय निर्णय घेण्यापूर्वी अर्थ मंत्रालयाकडून निर्णयाच्या परिणामांचा आढावा घेतला जातो. आयकर कपात केल्यास त्याचा अर्थव्यवस्ठेला किती फायदा होईल किंवा किती आर्थिक नुकसान सोसावं लागेल, याचाही अंदाज घेतला जात आहे. केंद्र सरकारकडून फेब्रुवारीत अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. तत्पूर्वी अर्थव्यवस्थेसाठी फायदेशीर ठरणाऱ्या सर्व प्रकारच्या निर्णयांचा विचार केला जात असल्याची माहिती या अधिकाऱ्याने दिली.














