नांदेड,(प्रतिनिधी)- येथील येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात चोवीस तासांत चोवीस रुग्णांचा मृत्यू झाल्याने राज्याच्या आरोग्य क्षेत्रात खळबळ उडाली होती. तर दुसऱ्या दिवशी पुन्हा सात रुग्णांचा मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे दरम्यान रुग्णालयात रुग्णांच्या मृत्यूचे तांडव थांबत नसल्याने चिंता व्यक्त करण्यात येतं आहे.दुसऱ्या दिवशी झालेल्या मृत्यू मध्ये दोन नवजात बालक व चार प्रौढ पुरूष यांचा समावेश आहे.

येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात एकुण सद्यस्थितीत ८२३ रुग्ण रुग्णालयामध्ये भरती आहेत. मागील चोवीस तासात म्हणजेच दि. २ ऑक्टोंबर ते ३ ऑक्टोंबरच्या मध्यरात्रीपर्यंत एकुण २ नवजात बालक व ४ प्रौढ पुरूष यांचा समावेश आहे. अशी माहिती वैद्यकिय अधिक्षक गणेश मनुरकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.
नांदेड येथील घटनेनंतर आता प्रशासन आणि सरकारकडून याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. दरम्यान, रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक पातळीवर मंजूर असलेली वर्ग 4 ची सुमारे 60 कर्मचारी तातडीने भरण्याचे निर्देश वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री गिरीश महाजन यांनी मंगळवारी झालेल्या बैठकीत दिले आहेत.














