जळगाव – जीवन हा उन सावल्याचा खेळ आहे, या उक्तीचा आधार घेऊन मांडण्यात आलेली संहिता म्हणजे सौ.रुपाली गुंगे लिखीत प्रा.राज गुंगे दिग्दर्शित सुबोध बहुउद्देशीय युवा विकास प्रतिष्ठान शिवाजीनगर जळगावचे नाटक ‘जतरा’. समाजाचे शहरी जीवन व ग्रामीण जीवन हे दोन भाग जरी असले तरी सर्वांच्याच जीवनात आनंद आणि दुःखाचे क्षण हे सारखेच असतात. फरक असतो तो फक्त राहणीमान आणि भाषेचा.
2018 मध्ये सोलापूर जिल्ह्याचे सांगोले तालुक्यात वाकी घेरडी या गावात जतरेत घडलेल्या सत्य घटनेवर आधारित ही नाट्यसंहिता. जतरा ही संकल्पना जरी जुनी असली तरी महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात जतरा ही गावाची परंपराच आहे. बड्या लोकांच्या मानापमान व इर्ष्येपोटी काही घटणा जाणीवपूर्वक वा नकळत घडतात. त्यातून घडते ते जीवन नावाचे नाटक. निसर्गाच्या अवकृपेला आणि परिस्थितीला कंटाळून महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या करत असताना एखादे कुटुंब व्यवसायात बदल म्हणून नवीन काम करु पाहते पण या कामाचा अनुभव नसल्याने त्यांना या व्यवसायात येणार्या अडचणी नवीनच असतात. कथेचा नायक हरी शेती हा मुख्य व्यवसाय सोडून जोडधंदा म्हणून टोपली, सुप, पोळपाट, शिके यांचा व्यवसाय करावा म्हणून जतरेत येतो. तिथे जागा मिळविण्यासाठी ते दुकान मांडेपर्यंत त्याची शेजार्यांशी हुज्जत, जतरेसारख्या सार्वजनिक उत्सवात येणार्या विविध स्वभावाच्या लोकांशी जुळणारी नाती आणि त्यातून उलगडले जाणारे आयुष्याचे पैलू या रंजकतेवर आधारित कथानक आहे.
स्त्री सन्मान ही आपल्या देशाची संस्कृती पण जतरेत घडणार्या प्रसंगामुळे हरी हा आपल्या संस्कृतीप्रमाणे वागतो आणि गावातल्या मोठ्या माणसाशी वैर घेऊन बसतो. तिथून कथा नकळत नव्या वळणावर जाते आणि मोठ्या माणसांशी होणार्या लढाईत गरीब माणसांना बरंच काही गमवावं लागतं. जतरेतून कोणी काही घेवून जातं, कोणी काही सोडून जातं पण एखादी घटना आयुष्यभरासाठीची आठवण ठेवून जाते, हे सांगण्याचा प्रयत्न करणारे जतरा हे नाट्य.
या नाट्यात निशा पाटील (सई), संजना पाटील (चिमी), दिग्वीजय जगदाळ (राजू), रत्ना ठाकरे (जनाबाई), सुनील पाटील (आप्पा), हर्षा बोरोले (राणी), शुभम चौधरी (तो), गुलाब तडवी (दादा), दर्शन पाटील (एक), प्रतीक बाविस्कर (दोन), शुभम तायडे (तीन, दत्तात्रय शेळके (व्यक्ती), हर्षदा वाघ (स्त्री), मोरेश्वर सोनार (बाळू), राज गुंगे (हरी) यांच्यासह संजना भोजणे, समृध्दी मोरे, माही जैन, राजवीर चोरडिया, आरव भदादे, गुंजश्री बोरोले, गार्गी पाटील यांच्या भूमिका तर तांत्रिक बाजूत रुपाली गुंगे यांचे नेपथ्य, रविकुमार परदेशी यांची प्रकाशयोजना, निखिल शिंदे यांचे पार्श्वसंगीत, सविता शिंदे यांची रंग व वेशभूषा तर राजेश शहाणे, प्रविण पांढरे, बाळू बोरकर यांची रंगमंच व्यवस्था होती. निर्मिती प्रमुख दीपक सुरळकर व मिलींद पाटील, संजय ठाकरे, यशवंत बाविस्कर, मानसी भदादे, पद्मजा घैसास, पार्थ ठाकर, विनिता पाटील यांचे सहकार्य लाभले होते.














