पारोळा : राज्यासह जिल्ह्यात महिलांसह अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना काही केल्या काही होताना दिसत नाहीय. अशातच मुकबधिर असलेल्या विवाहितेचा मध्यरात्री एका तरुणाने विनयभंग केल्याची घटना पारोळा तालुक्यात घडलीय. बोलता येत नसले तरी या विवाहितेने इशऱ्यानेच ही घटना पतीला समजावून फोटोवरुन अत्याचार करणाऱ्या तरुणासही ओळखले. रोहित अरविंद पाटील असे संशयित आरोपीचे नाव असून याच्या विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खेडेगावात राहणारे हे दाम्पत्य जन्मापासून मुकबधिर आहे. उन्हाळा असल्यामुळे दाम्पत्य घराच्या छतावर झोपण्यासाठी गेले होते. मध्यरात्री रोहित अरविंद पाटील हा तरुण छतावर आला. त्याने मुकबधीर असलेल्या या विवाहितेचे तोंड दाबून विनयभंग केला. काही वेळाने तरुण पळून गेला होता. यानंतर विवाहितेने आपल्यावर झालेला अत्याचार पतीस इशारे करुन सांगितला.
सकाळी हे दाम्पत्य पोलिस ठाण्यात गेले. बोलता येत नसल्यामुळे हा प्रकार कोणी केला? याची माहिती पोलिसांना मिळत नव्हती. अखेर गावातील काही तरुणांच्या मोबाइलमधून तिला फोटो दाखवण्यात आले. यात तिने रोहित पाटील याचा फोटो पाहून त्यानेच विनयभंग केल्याचा इशारा दिला. त्यानुसार पारोळा पोलिस ठाण्यात रोहित पाटील याच्या विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.