
जळगाव : कृषी विस्ताराच्या कार्यात गेल्या १४ वर्षांपासून प्रभावीपणे कार्य करणाऱ्या अॅग्रोवर्ल्डतर्फे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे उदघाटन शुक्रवार दि. २० रोजी दुपारी चार वाजता शहरातील एकलव्य क्रीडा संकुल, एम. जे. कॉलेज येथे होणार आहे. दि. २० रोजी २० ते २३ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या प्रदर्शनात ॲग्री स्टार्टअप, कृषी प्रक्रिया उद्योग, फळे आणि भाजीपाला सोलर ड्रायर मशीन, पापड उद्योग प्रमुख आकर्षण आहे. याशिवाय प्रदर्शनात नवतंत्रज्ञान, हायटेक फार्मिंग शेतमजुरीला पर्याय ठरतील, असे ड्रोन व लहान-मोठे शेती यंत्र व औजारांवर भर दिला आहे. या आधुनिक कृषी प्रदर्शनाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अॅग्रोवर्ल्डचे संस्थापक शैलेंद्र चव्हाण यांनी केले आहे.
ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवी, जिल्हा कृषी विकास अधिकारी पद्मनाभ म्हस्के, निर्मल सीड्सचे डॉ. सुरेश पाटील, पाटील बायोटेकचे प्रमोद पाटील, साईराम प्लास्टिकचे श्रीराम पाटील, प्लॅन्टो कृषीचे निखिल चौधरी, मेट्रोजन बायोटेकचे प्रियंक शहा, ओम गायत्री नर्सरीचे राजेंद्र गवळी यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील.
ॲग्रोवर्ल्ड च्या या चार दिवसीय कृषी प्रदर्शनात २२० पेक्षा अधिक स्टॉल्स असून प्रदर्शन मोफत आहे. शेतकऱ्यांना उपयुक्त ठरतील अशा लहान मोठ्या कृषी यंत्र व औजारांचे तब्बल ४० स्टॉल्स आहेत. बदलते हवामान, मजूर टंचाई, अद्ययावत तंत्रज्ञान, करार शेती, कमी पाण्यात येणारी पिके अशा शेतर्कयांची मागणी व गरजेवर आधारित मांडणी हे या प्रदर्शनाचे आकर्षण ठरणार आहे. ॲग्रोवर्ल्ड चे जळगावतील यंदाचे हे १२ वे प्रदर्शन आहे.
शेतीकामासाठी मजुरांची कमतरता भासत असल्याने त्यावर पर्याय म्हणून फवारणीसाठी ड्रोन, विविध प्रकारची कृषी यंत्रे आणि आधुनिक औजारांचे प्रात्यक्षिक व माहिती प्रदर्शनात मिळणार आहे. कमी पाण्यात, कमी श्रमात अधिक उत्पादन घेण्यास मदत करणारे तंत्रज्ञान, विविध पिकांमधील कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग, टिश्यूकल्चर केळीच्या १२ हून अधिक कंपन्या, फळे व भाजीपाला नर्सरी, सुधारित बियाण्यांचे आधुनिक वाण आणि नॅनो फर्टिलायझर यांचा समावेश आहे.
याशिवाय शेततळ्यांचे अस्तरीकरण, सोलर फार्मिंग, शेततार कुंपण, झटका मशीन, किचन गार्डन टूल्स, परसबाग व टेरेस गार्डनसाठी विविध रोपे यांची माहितीही मिळणार आहे. शेतकऱ्यांना बँकिंग सुविधा, शासकीय योजना, कृषी विभागाचे अनुदान आणि आधुनिक शेतीविषयक मार्गदर्शन एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे.
शेतीसोबतच पूरक व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठीही प्रदर्शनात यंदा प्रथमच विशेष माहिती उपलब्ध असेल. त्यात ॲग्री स्टार्टअप, कृषी आधारित प्रक्रिया उद्योग, फळे व भाजीपाला सोलर ड्रायर मशीन, पापड उद्योग आणि दाल मिल यांसारख्या व्यवसायांच्या संधींची माहिती दिली जाणार आहे. या पूर्वी नव्याने उद्योग सुरू करणाऱ्यांनी अहमदाबाद, पुणे व मुंबई येथे जावून माहिती घ्यावी लागत होती. मात्र, ॲग्रोवर्ल्ड ही संधी खानदेशातील नवद्योजकांसाठी उपलब्ध करून दिली आहे. याशिवाय मल्चिंगसाठी ३२ हजार रुपये, विडमॅट तंत्रज्ञानासाठी एक लाख रुपये, पशुपालन व्यवसायासाठी पाच ते आठ लाख रुपये, तर मुरघास हार्वेस्टर व बेलरसाठी १३ ते १९ लाख रुपयांपर्यंतच्या अनुदानाची माहिती शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यामुळे शेतीला जोडधंद्याची जोड देऊन उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण करण्यासाठी हे प्रदर्शन उपयुक्त ठरणार आहे.
ई- स्कूटर जिंकण्याची संधी
निर्मल सिडसतर्फे पहिल्याच दिवशी पहिल्या पाच हजार जणांना किचन गार्डन बियाणे पाकीट मोफत वितरित केले जाणार आहे. याव्यतिरिक्त रोज शंभरपेक्षाही अधिक जणांना लकी ड्रॉ द्वारे आकर्षक बक्षीसांसह सिका ई- मोटर्सतर्फे ई-स्कूटरचे बंपर बक्षीस जिंकण्याची संधी आहे. तरी शेतकऱ्यांनी या आधुनिक कृषी यंत्र व अवजारे प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.











