मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना एका महिलेने धमकी देत 5 कोटी रुपयांची मागणी केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. पैसे न दिल्यास बलात्काराची तक्रार दाखल करेन अशी धमकी संबंधित महिलेने धनंजय मुंडे यांना दिली असून मुंडे यांनी या महिलेच्या विरोधात मुंबईच्या मलबार हिल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
या महिलेने काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांच्याविरोधात ओशिवरा पोलिस ठाण्यात बलात्काराची तक्रार केली होती. पण, काही दिवसानंतर ही तक्रार मागे घेण्यात आली. त्यानंतर सदर महिलेने फेब्रुवारी ते मार्च महिन्याच्या दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून फोन करून बलात्काराची तक्रार देण्याची धमकी धनंजय मुंडेंना दिली.
तसेच धनंजय मुंडे यांना 5 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी देखील केली. 5 कोटी रुपयांचे दुकान आणि महागडा मोबाईल द्यावा, असा तगादा आरोपी महिलेने मुंडेंकडे लावला. तसेच मागण्या पूर्ण न केल्यास सोशल मीडियावर बदनामी करून पुन्हा बलात्काराचा गुन्हा दाखल करू, अशी धमकी दिली.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडेंवर त्यांच्या दुसऱ्या पत्नी करुणा शर्मा यांनी देखील आरोप केले होते. मुंडेंविरोधात गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. तसेच करुणा शर्मा यांनी माध्यमांसमोर देखील मुंडेंवर गंभीर आरोप केले होते. पण, मुंडे यांनी वेळीच स्पष्टीकरण देत त्या माझ्या पत्नी असल्याचं सांगितलं होतं.