चाळीसगाव : तालुक्यातील बिलाखेड शिवारातील शेतात निंदणीचे काम करीत असलेल्या महिलेला तुटलेल्या विद्युततारांचा स्पर्श झाल्याने एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. उषाबाई रवींद्र कोळी (३६ रा. बिलाखेड) असे या मृत महिलेचे नाव आहे. तर या घटनेत दुसरी एक महिला जखमी झाली.
बिलाखेड शिवारातील शेतात उषा कोळी व मंगल संभाजी गायकवाड या दोन महिला शनिवारी निंदणीसाठी गेल्या होत्या. निंदणीचे काम करीत असतानाच विद्युत खांब्यावरील तुटलेल्या विजेच्या तारांचा त्यांचा स्पर्श झाला. यात उषा कोळी यांना जबर विजेचा धक्का बसल्याने त्यांचा जागेवर मृत्यू झाला, तर मंगल गायकवाड या जबर जखमी झाल्या आहेत.
मयत महिलेला महावितरणाकडून तत्काळ भरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.















