फैजपूर । दारू विक्री करणार्या व्यावसायीकास नियमित धंदा करू देण्यासाठी व कारवाई न करण्यासाठी दर महिन्याला पाचशे रुपयांची लाच मागणार्या फैजपूर पोलीस ठाण्यातील गोपनिय विभागातील पोलीस नाईक याला आज लाच घेतांना लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. अनिल महाजन असे लाच घेणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव असून यामुळे जिल्हा पोलीस दलातील वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
याबाबत असे की, तक्रारदार यांचे दारू विक्रीचा व्यवसाय आहे. फैजपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्यांचे दारू विक्रीचे दुकान आहे. दरम्यान दारू व्यवसाय सुरू ठेवायचा असेल तर दर महिन्याला ५०० रूपये द्यावे लागतील अशी मागणी फैजपूर पोलीस ठाण्यातील गोपनिय विभागातील पोलीस नाईक अनिल महाजन यांनी तक्राराकडे केली. त्यानुसार तक्रारदार यांनी जळगाव येथील लाचलुचपत विभागात जावून तक्रार दिली.
तक्रारीची पडताळणी करण्यासाठी आज दुपारी २ वाजता सापळा रचून संशयित आरोपी पोलीस नाईक अनिल महाजन यांनी ५०० रूपये घेतांना रंगेहात पकडले. या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शशीकांत पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव यांच्यासह सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे.