जळगाव : जिल्हा विशेष शाखेतील कर्मचारी यांना अश्लील बदनामीकारक संदेश पाठवल्याप्रकरणी पोलिस मुख्यालयातील हेडकॉन्स्टेलबलला सायबर पोलिसांनी अटक केली. नरेंद्र लोटन पाटील (वारुळे) असे अटक करण्यात आलेल्या पोलिस हेडकॉन्स्टेबलचे नाव आहे.
याबाबत असे कि, सायबर पोलिस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत एका महिला तक्रारदाराच्या तक्रारीवरून ४ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यामध्ये फिर्यादी महिलेबद्दल जिल्हा विशेष शाखेतील कर्मचाऱ्यांना अश्लील बदनामीकारक संदेश पाठवले होते.
या प्रकरणी पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे व अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी कारवाईचे आदेश दिले होते. सायबर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बळीराम हिरे व कर्मचाऱ्यांनी या गुन्ह्याचा तपास केला. गुन्ह्याच्या तपासात मोबाइल क्रमांकाच्या माहितीवरून व प्राप्त झालेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजच्या विश्लेषणावरून हा गुन्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात काम करणारा पोहेकॉ नरेंद्र वारुळे याने केला असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला या गुन्ह्याच्या तपासासाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
वारुळे हा सायबर विषयातील तज्ज्ञ आहे. स्थानिक गुन्हे शाखेला गुन्हेगारांचे लोकेशन काढून देण्यास तो मदत करीत होता; मात्र त्यानेच सायबर गुन्हा केल्याचे समोर आले आहे.