मुंबई,- केंद्र सरकारने केलेले काळे कृषी कायदे,इंधन दरवाढ व कामगार कायद्यातील अन्यायकारक बदलांना विरोध करण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाच्यावतीने दि. २६ मार्च २०२१ रोजी पुकारण्यात आलेल्या भारत बंदला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हा, तालुका पातळीवर निर्धाराने या भारत बंद मध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केले आहे.
संयुक्त किसान मोर्चा या बॅनर खाली देशातील 500 पेक्षा जास्त संघटना एकत्र येउन दिल्लीच्या सीमेवर शेतकरी बांधव शांततामय मार्गाने केंद्र सरकारने केलेले काळे कृषी कायदे रद्द करण्यासाठी आंदोलन करत आहे.
राष्ट्रवादी पक्षाने बंद ला पाठिंबा देण्याबाबत प्रसिद्धी पत्रक काढले असून त्यात म्हटले आहे की, केंद्रातील भाजपच्या सरकारने सार्वजनिक संपत्तीची विक्री करणारे जनविरोधी निर्णय घेतलेले आहे, इंधन व गॅस सिलेंडरच्या झालेल्या प्रचंड वाढीमुळे सर्वसामान्यांना जीवन जगणे कठीण झाले आहे. कामगार कायद्यातील बदलामुळे कामगार देशोधडीला लागले आहे. या सर्व बाबींना विरोध दर्शविण्यासाठी संयुक्त किसान मोर्च्याच्या वतीने दि.26 मार्च रोजी भारत बंदची हाक दिलेली आहे त्यामुळे या बंद ला राष्ट्रवादी पक्षाने पाठिंबा दिला आहे.















