मुंबई, (प्रतिनिधी)- ‘बॉस’, ‘ताई’, ‘दादा’, ‘बाबा’ सर्वांनी लक्षात ठेवा वाहनावर सजावटी ‘नंबर प्लेट’ लावल्यास आपल्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते…. हे चालणार नाही असा सूचक इशारा महाराष्ट्र पोलीस विभागाच्या वतीने आज ट्विटर हॅण्डल वरून दिला आहे.
गाड्यांवर फॅन्सी नंबर प्लेट लावण्याचा एक ट्रेंड सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर पोलिस विभागाने ‘हे चालणार नाही ‘असं म्हणत कारवाईचे संकेत दिले आहे.रस्त्यावर अनेक गाड्या धावताना दिसतात. त्या गाड्यांवर फॅन्सी नंबर प्लेटही बसवलेल्या पाहायला मिळतात.

दादा, मामा, भाऊ,बॉस अशा नावांचे नंबर जुळवलेली नंबर प्लेट लावलेली वाहनं अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. मात्र आपण देखील असं सजावटी नंबर प्लेट लावलेलं वाहन वापरत असाल तर आताच सावधान व्हा, कारण ज्यांच्या वाहनांच्या नंबर प्लेट सजावटी आहेत अशा वाहन चालक अन् दुचाकीस्वारांच्या विरोधात पोलिसा कारवाई करतील असे संकेत दिले आहे.
कायद्याने अपराध…
सजावटी नंबर प्लेट लावणे अवैध
मोटार वाहन कायदा-1988 आणि मोटार वाहन नियम-1989 नुसार वाहनांवर सजावटी नंबर प्लेट लावणे अवैध आहेत. गुन्हेगारी करतांना वापरण्यात येणाऱ्या वाहनांची ओळख पटू नये म्हणून फॅन्सी नंबर प्लेट लावल्या जात असल्याचं मत आहे.















