मुंबई, दि. २० : ऑनलाईन पेटीएम अपहार करणाऱ्या पेटीएम कर्मचाऱ्यास महाराष्ट्र सायबर विभागाने जेरबंद केले. यामुळे छोटे व्यापारी आणि शेतकऱ्यांचे कष्टाचे पैसे वाचवण्यात यश आले असल्याची माहिती सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव यांनी दिली आहे.
यासंदर्भात दि. ०५ ऑक्टोबर रोजी मुंबईच्या अंधेरी भागातील दुग्ध व्यावसायिक राजेश मनसुख पटेल यांनी महाराष्ट्र सायबरकडे तक्रार केली की, दि.२० ऑगस्ट २०२० आणि दि. २० सप्टेंबर २०२० रोजी त्यांच्या पेटीएम अकाउंट मधून त्यांचे अपरोक्ष ५० हजार ४४८ रुपये अज्ञात व्यक्तीने काढून घेतले आहेत.
तक्रारीवरुन नोडल सायबर पोलीस ठाणे, महाराष्ट्र सायबर, येथे भारतीय दंड विधान कलम ४२०, ३४ तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० चे कलम ४३ (अ),६६, ६६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होतात घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ नोडल सायबर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांनी गुन्ह्याशी संबधित बाबींची तपासणी, अभ्यास करून तांत्रिक पद्धतीने तपास करत संशयीत आरोपी MD, MUNNA उर्फ मोहम्मद मुन्ना, पाशिउद्दीन अन्सारी, वय २५ वर्षे, व्यवसाय – फिल्ड सेल्स एक्झिक्युटीव्ह, यास तात्काळ अटक करण्यात आले. आरोपीने इतरही व्यावसायिकांचे पेटीएम अकाऊंटचे पासवर्ड चोरून ते गैरकामासाठी वापरल्याचे पुढे येत आहे.