चोपडा : जनजागृती करूनही लाचखोरीचे प्रमाण काही कमी होत नाहीय. जळगाव जिल्ह्यात आठवड्यातून एक दोन तरी कारवाई होतच आहे. अशातच आता चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशनचा सहायक फौजदार जाळ्यात अडकला आहे. १५ हजाराचा घेताना जळगावच्या एसीबीने रंगेहात अटक केली. शिवाजी ढगू बाविस्कर असे लाचखोर सहायक फौजदाराचे नाव असून या कारवाई खळबळ उडाली आहे.
नेमकं प्रकरण काय
दिनांक 23 ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास याप्रकरणी तक्रारदाराचा चुलत भाऊ व त्याचा मित्र यांची तीन पोलीसांनी लासूर ते सत्रासेन रस्त्यावर मोटार सायकल अडवली होती. तुमच्या जवळ गांजा आहे असे सांगुन तुम्ही पोलीस स्टेशनला चला, तुमच्याजवळ गांजा असून तुमच्याविरुद्ध गांजाची केस करायची आहे. जर गांजाची केस व मोटार सायकल सोडवायची असेल तर आम्हाला प्रत्येकी 75 हजार रुपये आम्हाला द्यावे लागतील असे त्यांना सांगितले.
दरम्यान तक्रारदाराच्या नातेवाईकांनी पहाटे चार वाजेच्या सुमारास तीस हजार रुपये दिले तरीदेखील मोटार सायकल ठेवून घेतली. मोटार सायकल सोडवायची असल्यास राहिलेले वीस हजार रुपये द्या असे सांगितले. त्यानंतर दि. 24 ऑगस्ट रोजी तक्रारदाराकडे गांजाची केस न करण्यासह मोटार सायकल सोडवण्यासाठी वीस हजार रुपयांची मागणी करण्यात आली. दरम्यान तडजोडीनंतर पंधरा हजार रुपये पंचासमक्ष सहायक फौजदार शिवाजी बाविस्कर यांनी घेतले. त्याचवेळी एसीबीच्या पथकाने कारवाई केली. चोपडा शहर पोलिस स्टेशनला याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.