नवी दिल्ली : ओमिक्रॉनचा देशात धोका वाढतच चालला आहे. आज महाराष्ट्रात ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. यासह, आतापर्यंत देशात चार ओमिक्रॉन प्रकारांची प्रकरणे समोर आली आहेत. महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या संचालकांनी सांगितले की, मुंबईजवळील कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील एका व्यक्तीमध्ये ओमिक्रॉनची पुष्टी झाली आहे. हा व्यक्ती दक्षिण आफ्रिकेतून प्रवास करून भारतात परतला होता.
दुबई आणि दिल्लीमार्गे मुंबईला पोहोचले होते
मिळालेल्या माहितीनुसार, हा ३३ वर्षीय व्यक्ती २४ नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनहून दुबई आणि दिल्लीमार्गे मुंबईला पोहोचला. त्या व्यक्तीने अद्याप कोणतीही लस घेतलेली नाही. या व्यक्तीच्या उच्च जोखमीच्या संपर्कात आलेल्या 12 लोकांचा आणि कमी जोखमीच्या संपर्कात आलेल्या 23 जणांचा शोध घेण्यात आला आहे. या सर्वांचा कोविड-19 चा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली-मुंबई विमान प्रवासादरम्यान या व्यक्तीसोबत प्रवास करणाऱ्या २५ प्रवाशांचा कोविड-१९ अहवालही निगेटिव्ह आला आहे. आता संपर्कात आलेल्या आणखी लोकांचा शोध घेतला जात आहे. याआधी शनिवारीच गुजरातच्या जामनगर येथील ओमिक्रॉनचे प्रकरण समोर आले होते. ती व्यक्तीही दक्षिण आफ्रिकेतून प्रवास करून परतली होती. याशिवाय कर्नाटकातील बेंगळुरू येथे दोन प्रकरणे समोर आली आहेत.