तुमच्या शरीरातील रक्ताचे प्रमाण जर कमी असेल तर तुम्हाला विविध आजारांना सामोरे जाण्याची वेळ येत असते. रक्त दिल्याने रक्त वाढत असते हे शासकीय पातळीवरून आणि विविध आरोग्य यंत्रणांकडून सांगण्यात येते. आजच्या आधुनिक काळातही रक्तनिर्मितीबाबत विशेष कृत्रिम तंत्रज्ञान निर्माण झालेले नाही. यामुळे आपण एखाद्याला रक्त दिल्यानंतर दुसऱ्याचा जीव वाचू शकतो.

अपघात किंवा अन्य कारणांनी झालेल्या गंभीर दुखापती,भाजणे, शस्त्रक्रिया, थॅलेसेमिया आणि गरोदर महिलांना रक्ताची नितांत गरज असते किंवा अन्य वैद्यकीय कारणांमुळे मोठ्या प्रमाणात रक्त गमावलेल्या लोकांसाठी तुम्ही-आम्ही दान केलेले रक्त संजीवणी ठरत असते. त्यामुळे सर्वांनी रक्तदान करण्यासाठी पुढे येण्याची सध्या गरज आहे.
रक्तदानाची ही गरज ओळखून या गरजेच्या पूर्ततेसाठी खारीचा वाटा उचलण्याचे काम आपल्या नाशिकचे समाजसेवक दिलीप केदारनाथ कोठावदे यांनी केले असून त्यांनी एकदा-दोनदा नव्हे तर तब्बल १४० वेळा रक्तदान करून तरुण व सक्षम पिढीला दिशादर्शनाचे कार्य केले आहे.
त्यांच्या या कार्याने मानवसेवेची ज्योत प्रज्वलित केली आहे. नाशिक शहराचा अविभाज्य भाग बनलेल्या नवीन नाशिक परिसरात राहणाऱ्या दिलीप कोठावदे यांनी वयाच्या १८ व्या वाढदिवसापासून आपल्या रक्तदान महायज्ञाला सुरुवात केली. तेव्हापासून त्यांनी दर तीन महिन्यांनी रक्तदान करण्याचा संकल्प सिद्धीस नेला आहे. यातून त्यांनी रक्ताच्या गरजेसाठी झगडणाऱ्या शेकडो रुग्णांना जीवनदान देण्याचे अनोखे कार्य केले आहे.
व्यवसाय करता करता पत्रकारिता, छायाचित्रण,चित्रकला,पर्यटन,लेखन,थर्मोआर्ट असे एक ना अनेक छंद जोपासलेल्या या अवलीयाने आपल्या छंदाला व्यवसायाचे स्वरूपही दिले आहे.
दिलीप कोठावदे यांनी आतापर्यंत केलेल्या १४० रक्तदानापैकी १३३ वेळा नाशिकच्या जनकल्याण रक्तकेंद्रात केलेले आहे. तर जिल्हा शासकीय रक्त पेढीत एकदा व उर्वरित रक्तदान अत्यवस्थ रुग्णांसाठी विविध ठिकाणी केलेले आहे. विशेष म्हणजे त्यांनी आजवर केलेले सगळे रक्तदान हे संपूर्ण रक्तदान असून संपूर्ण रक्तदान हे तीन महिन्यातून एकदाच करता येते. त्यामुळे त्यांच्या रक्तदानाचे महत्व अधोरेखित होते.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे नाशिक शहर अध्यक्ष असलेल्या कोठावदे यांची ब्राव्हो वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये रक्तदानाचे शतक करणारा जगातील एकमेव पत्रकार म्हणून नोंद झाली आहे.याशिवाय महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड्स, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स,आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्येही त्यांच्या रक्तशंभरीची दखल घेण्यात आली आहे.
अमेरिकेच्या गोल्डन बुक ऑफ रेकॉर्ड्स कडून २०२१ मधील जगातील १०१ प्रेरणादायी व्यक्तिमत्वांमध्ये त्यांचा समावेश करण्यात आला असून यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी,गायक अनुप जलोटा व दिलीप कोठावदे यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय स्थानिक,जिल्हा,राज्य व राष्ट्रीय पातळीवरही त्यांच्या या रक्तकार्याचा गौरव झाला असून त्यांना १३५ हुन अधिक पुरस्कारही मिळालेले आहेत.
केवळ स्वतः रक्तदान करून ते थांबलेले नाहीत तर त्यांनी मोठ्या संख्येने रक्तदान शिबिरांचे आयोजन करून रक्तदानाचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे.
एखाद्या रुग्णाला अगदी तातडीच्या वेळी रक्ताची गरज भासली तर ते रक्त उपलब्ध करून देण्यासाठीही ते सातत्याने प्रयत्नशील असतात.
त्यांच्या प्रेरणेने अनेक तरुणांनी रक्तदान करायला सुरुवात केली असून त्यातील अनेकांनी रक्तदानाचा २५,५०,७५ चा टप्पा गाठला आहे.
आपल्या शरीरात असलेले रक्त गरजु रुग्णांच्या उपयोगी पडून त्यांचे जीवन वाचविण्याइतके मोठे समाधान व आनंद अन्य कोणत्याही कार्यात नाही. त्यामुळे प्रत्येक सक्षम व्यक्तीने वर्षातून किमान दोन वेळा तरी रक्तदान करायलाच हवे.आजच्या धकाधकीच्या काळात बीपी,डायबेटीस, हृदयविकार यासारख्या आजारांचे प्रमाण खुप मोठे असल्याने रक्तदात्यांच्या संख्येवर त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे प्रत्येकाने रक्तदान करण्याचा निर्णय घेतला पाहिजे.
-लेखक : संजय एन.भामरे,पुणे










