पुण्यातील कल्याणीनगर परिसरात पोर्शे कारने दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन मुलाचे वडील आणि पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवालसह दोन जणांना पुणे पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरातील एका लॉजमधून रात्री 2:30 वाजता अटक करून पुणे पोलिसांच्या स्वाधीन केले.
porsche car accident pune
आलिशान पोर्शे कारचे जीपीएस ट्रॅक करत पुणे पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला होता. मंगळवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या साहाय्याने पुणे पोलिसांनी ही कारवाई केली. पहाटे साडेचारच्या सुमारास पोलिस निरीक्षक कृष्णा बाबर यांचे पथक शहरात दाखल झाल्यावर आरोपींना त्यांच्या स्वाधीन करण्यात आले. शनिवारी पुण्यातील कल्याणीनगरात रात्री उशिरा विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाने मद्य प्राशन करून कार चालवून दुचाकीवर असलेल्या एक तरुण तरुणीला चिरडले होते.
पुण्याला गुन्हा दाखल झाल्यावर विशाल अग्रवाल फरार झाला होता. त्याच्या गाडीचे जीपीएस ट्रॅक केले असता छत्रपती संभाजीनगरचे लोकेशन पुणे पोलिसांना आढळून आले. ही कार नारळीबाग परिसरातील जेपी इंटरनॅशनलसमोर उभी असल्याचे पोलिसांना कळले. या माहितीच्या आधारे छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी मागोवा घेत त्या हॉटेलमधून चालक चत्रभुज डोळस आणि एका व्यक्तीस ताब्यात घेतले. त्याने दिलेल्या माहितीनंतर विशाल अग्रवालला रेल्वे स्टेशनसमोरील लॉज वरून या दोघांना अटक करण्यात आली आहे.










