संपूर्ण कर्जमाफीसह अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱयांना हेक्टरी २५ हजार द्या
भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांची मागणी
मुंबई – शेतकऱयांना संपूर्ण कर्जमाफीसह मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱयांना हेक्टरी २५ हजार नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी केली. भारतीय जनता पक्षाच्या वतीने मंगळवारी कोल्हापूरमध्ये मा.चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये जिल्ह्यातील हजारो शेतकरी, भाजपाचे जिल्ह्यातील नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
मा. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, “महाआघाडी सरकार स्थापन होण्यापूर्वी मा. शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱयांना संपूर्ण कर्जमाफी देऊन सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. तसेच, मा.उद्धव ठाकरे यांनी शपथविधीपूर्वी शेतकऱयांच्या बांधावर जाऊन हेक्टरी २५ हजार नुकसानभरपाई देण्याचा शब्द दिला होता. त्यानुसार, सरकारने शेतकऱयांना दिलेला शब्द पूर्ण करून त्यांना न्याय द्यावा.”
ते पुढे म्हणाले की, “महाआघाडी सरकारने २००१ पासूनची कर्जमाफी न करता, २०१५ पासूनचीच कर्जमाफी केली. नागपूर मधील हिवाळी अधिवेशनात यावर सातत्याने आवाज उठविला. मात्र, महाआघाडीच्या विश्वासघातकी सरकारने यावर अवाक्षरही न काढता, कोणतंही नियोजन नसताना, कर्जमाफी जाहीर केली. तसेच, अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱयांना सांगितल्यानुसार नुकसानभरपाई दिली नाही. त्यामुळे शेतकऱयांना संपूर्ण कर्जमाफीसह नुकसानभरपाई द्यावी.”
मोर्चामध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस सुरेश हाळवणकर, प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक, कोल्हापूर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष समरजीत घाटगे, भाजपा शहराध्यक्ष राहुल चिकोडे, बाबा देसाई, हिंदुराव शेळके, महेश जाधव, भगवान काटे, शिवाजी माने, भरमुआण्णा पाटील सहभागी झाले होते.














