ऑकलंड – श्रेयस अय्यरच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात शानदार विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत न्यूझीलंडने २०३ धावा केल्या होत्या.
विजयासाठी २०४ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरूवात खराब झाली. हिटमॅन रोहित शर्मा ७ धावांवर बाद झाला. त्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि केएल राहुल यांनी दुसऱ्या विकेटसाठी ९९ धावांची भागिदारी केली. ही जोडी संघाला विजय मिळवून देईल असे वाटत असतानाच राहुल ५७ धावांवर बाद झाला. त्यापाठोपाठ विराट कोहली देखील ४५ धावावर माघारी परतला. या दोन विकेटमुळे भारताची अवस्था ३ बाद १२१ अशी झाली.
शिवम दुबेने काही आक्रमक शॉट खेळले. पण त्याला मोठी धावसंख्या उभी करता आली नाही. तो १३ धावा करून बाद झाला. त्याआधी कॉलिन मुन्रो आणि मार्टिन गप्टिल यांनी न्यूझीलंडच्या डावाची सुरुवात केली. या दोन्ही सलामीवीरांनी पहिल्या षटकापासून आक्रमक खेल सुरू केला. पहिल्या ५ षटकात न्यूझीलंडच्या ५० धावा झाल्या होत्या. न्यूझीलंडची ही जोडी शतकाकडे वाटचाल करत असताना शिवम दुबेच्या चेंडूवर रोहित शर्माने गप्टिलचा सीमा रेषेवर शानदार कॅच घेतला आणि टीम इंडियाला पहिला ब्रेक मिळाला.
त्यानंतर मुन्रोने अर्धशतक पूर्ण केले. पण शार्दुल ठाकूरच्या चेंडूवर तो झेलबाद झाला. त्याने ५९ धावा केल्या. मुन्रो बाद झाल्यानंतर दुसऱ्याच षटकात जडेजाने कॉलिन डी ग्रँडहोमला शून्यावर बाद करत न्यूझीलंडला तिसरा धक्का दिला. ग्रँडहोमच्या जागी आलेल्या रॉस टेलर आणि कर्णधार केन विल्यम्सन भारतीय गोलंदाजावर तुटून पडले. विल्यम्सनने २५ चेंडूत अर्धशतक केले. पण अर्धशतक झाल्यानंतर दुसऱ्याच चेंडूवर तो बाद झाला. त्याला चहलने बाद केले.
टीम सेफर्टला जसप्रीत बुमहारने १ धावावर बाद करून न्यूझीलंडला पाचवा धक्का दिला. अखेरच्या षटकात रॉस टेलरने टी-२०मधील अर्धशतक पूर्ण केले. त्याने नाबाद ५४ धावा केल्या. भारताकडून जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, चहल, शिवम दुबे आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.