रावेर,(रवी महाजन) – तालुक्यातील कोचुर खुर्द येथील लोकनियुक्त सरपंच ज्योती संतोष कोळी यांना जिल्हाधिकारी जळगाव यांनी पुन्हा एकदा अपात्र घोषित केले आहे. एसटी राखीव जागेवरून निवडून आलेल्या ज्योती कोळी यांनी नियमानुसार मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नसल्याने ही कारवाई करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, यापूर्वीही जात वैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्यामुळे त्यांना अपात्र ठरविण्यात आले होते. मात्र, शासनाने अपात्र ठरलेल्या सरपंचांना एक वर्षाची मुदतवाढ देत पुन्हा पद बहाल केले होते. शासनाच्या आदेशानुसार, ज्या लोकप्रतिनिधींचे जात वैधता प्रमाणपत्राचे प्रस्ताव पुराव्यानिशी जात पडताळणी समितीकडे प्रलंबित आहेत, त्यांनाच ही मुदतवाढ लागू होती.
परंतु, ज्योती कोळी यांनी धुळे येथील जात वैधता पडताळणी समितीकडे आवश्यक प्रस्तावच सादर केला नसल्याचे समोर आले. याबाबत समितीने ग्रामपंचायत सदस्य लिलाबाई घनश्याम तायडे यांना लेखी माहिती दिली होती.
यानंतर, “जात वैधता प्रस्तावच दाखल नसताना सरपंच पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही,” असा दावा करत ग्रामपंचायत सदस्य लिलाबाई तायडे यांनी जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे पुन्हा तक्रार दाखल केली होती.
या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांसमोर सुनावणी घेण्यात आली. सुनावणीनंतर जिल्हाधिकारी यांनी सरपंच ज्योती कोळी यांना अपात्र घोषित करण्याचा आदेश दिला.
या प्रकरणात तक्रारदार लिलाबाई घनश्याम तायडे यांच्या वतीने विश्वासराव भोसले यांनी कामकाज पाहिले.













