नवी दिल्ली – पंजाब अँड महाराष्ट्र्र को ऑप. बँक प्रकरणी (पीएमसी बँक) केंद्र सरकारने तातडीने लक्ष घालावे आणि खातेदारांना दिलासा द्यावा याकरिता आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांची दिल्लीत भेट घेतली. ठाकूर यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्याचा दावा पवारांनी केला आहे.
‘पीएमसी’ बँकेवरील रिझर्व्ह बँकेच्या निर्बंधांमुळे खातेदार भरडून निघाले आहेत. बँकेचे पुनरुज्जीवन करावे, अशी मागणी पवार यांनी केली आहे. यासंदर्भात आज त्यांनी अनुराग ठाकूर यांना निवेदन दिले. बँकेच्या पुनरुज्जीवनाबाबत ठाकूर यांच्याशी चांगली चर्चा झाली, असे पवार यांनी ट्विट केले आहे. काही दिवसांपूर्वी राज्याचे कबिनेट मंत्री जयंत पाटील यांनी ‘पीएमसी’ बँकेचे राज्य शिखर बँकेत विलीनीकरण करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन असल्याचे म्हटलं होते. येत्या १ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार असून त्यात पीएमसी बँक खातेदारांना दिलासा देण्याच्या दृष्टीने अर्थमंत्री निर्मला सीतारामन घोषणा करतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.














