बीड (प्रतिनिधी) महाराष्ट्रातील प्रतिष्ठित ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीने वृत्तपत्र आणि डिजीटल माध्यमातील नाविण्यपूर्ण भरीव योगदानाची दखल घेवून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांचा ‘महाराष्ट्राचे अनमोल रत्न’ हा पुरस्कार देवून गौरव केला. प्रसारमाध्यम क्षेत्रातून या पुरस्कारासाठी निवडलेले मुंडे हे एकमेव पत्रकार. यापुर्वीही लोकमत मिडीया ग्रुपच्यावतीने त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराने सन्मानीत करण्यात आलेले आहे.
महाराष्ट्रातील आघाडीची वृत्तवाहिनी एबीपी माझाने यावर्षी उद्योगासह विविध क्षेत्रात नाविण्यपूर्ण काम करणार्या लोकांना ‘महाराष्ट्राचे अनमोल रत्न’ हा पुरस्कार देवून सन्मानीत केले.
मुंबईतील कोर्टयार्ड मेरिट या पंचतारांकित हॉटेलमध्ये शुक्रवार, दि.8 सप्टेंबर 2023 रोजी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, एबीपी वृत्तवाहिनीचे कार्यकारी उपाध्यक्ष राजीव खांडेकर, प्रसिध्द अभिनेत्री सोनाली कुलकर्णी या मान्यवरांच्या हस्ते हा सन्मान सोहळा झाला. यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या वृत्तपत्राचे अर्थकारण आणि पत्रकारांच्या समस्या, त्याचबरोबर संघटनेच्या माध्यमातून राज्यभर राबवलेले सामाजिक उपक्रम आणि एओन प्लेच्या माध्यमातून डिजीटल माध्यमात केलेल्या नाविण्यपूर्ण उपक्रमाची दखल घेवून या पुरस्कारासाठी निवड केली.
मान्यवरांच्याहस्ते हा पुरस्कार मुंडे यांना प्रदान करण्यात आला. राज्यभरातील उद्योग व विविध क्षेत्रातील निवडलेल्या विजेत्यांमध्ये प्रसारमाध्यम क्षेत्रातून निवडलेले वसंत मुंडे हे एकमेव. ग्रामीण भागातून राज्यस्तरावर आपल्या कार्याची छाप मुंडे यांनी निर्माण केल्यामुळे त्यांचा गौरव झाला. यापूर्वीही लोकमत मिडीया ग्रुपच्यावतीने दुबई येथे आंतरराष्ट्रीय स्तरावरील एक्सलन्स इन सोशल जर्नालिझम अवार्ड देवून त्यांना सन्मानीत करण्यात आले होते. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे राज्यभरातून अभिनंदन होत आहे.
एबीपी माझाचा ‘अनमोल रत्न’ पुरस्कार नवीन उर्जा देणारा-वसंत मुंडे
मराठी वृत्तवाहिन्यांच्या स्पर्धेतही ‘एबीपी माझा’ने आपले वेगळेपण जपले आहे. सामाजिक बांधिलकी आणि तळागाळातील लोकांचे प्रश्न मांडण्याला प्राधान्य दिले जाते. वाहिनीचे कार्यकारी उपाध्यक्ष राजीव खांडेकर यांच्या कल्पकतेतून समाजातील दुर्लक्षीत लोकांना जगासमोर आणले जाते. यावर्षी वृत्तपत्र आणि डिजीटल माध्यमातून नाविण्यपूर्ण कामाची दखल घेवून एबीपी माझाने अनमोल रत्न या पुरस्कारासाठी निवड केली. हा पुरस्कार अधिक चांगले काम करण्यासाठी नवी उर्जा देणारा आहे. अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.