नवी दिल्ली- केंद्र सरकारने लोकसभेत आणलेल्या नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मांडण्याच्या बाजूने शिवसेनेने मतदान केलं आहे. या विधेयकातील काही तरतूदींना शिवसेनेचा आक्षेप असतानाही विधेयक मांडण्याच्या बाजूने शिवसेनेने मतदान केलं असून प्रत्यक्ष विधेयकाला मंजुरी देताना शिवसेना काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला सोडचिठ्ठी देत केंद्राच्या सत्तेतून बाहेर पडल्यानंतर शिवसेनेने पहिल्यांदाच एनडीएच्या बाजूने मतदान केलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज लोकसभेत हे विधेयक मांडल. शहा यांनी विधेयक मांडतानाच विरोधाकांनी एकच गदारोळ केला. त्यामुळे संसदेचं वातावरण तापलं होतं. त्यापूर्वी हे विधेयक लोकसभेत मांडण्यासाठी मतदान घेण्यात आलं. त्याला २९३ खासदारांनी पाठिंबा दिला. तर विधेयक मांडण्याच्या विरोधात ८२ मतं पडली. सध्या लोकसभेत या विधेयकावर चर्चा सुरू असून सत्ताधाऱ्यांकडून विधेयकाचं महत्त्व विशद करण्याचा प्रयत्न केला जात आहे.














