यावल : जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारी वाढताना दिसून येत असून गेल्या आठवड्यात दोन खून झाल्याच्या घटना ताज्या असताना आणखी एका खुनाची घटना समोर आलीय. यावल तालुक्यातील किनगाव येथील इंदिरानगर भागातील रहिवाशी 60 वर्षीय वृद्धाची गळा चिरून व दगडाचे ठेचून निर्घृण हत्या झाल्याची बाब आज शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. भीमराव सोनवणे (60) हे मयत वृद्धाचे नाव असून या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, घटनास्थळी पोलिसांचे पथक दाखल झाले आहे.
भीमराव सोनवणे (60) हे यावल तालुक्यातील किनगाव बुद्रुक येथे मुलगा व सुन यांच्यासोबत वास्तव्याला होते. खासगी वाहन चालवून आपला उदरनिर्वाह करत होते. शुक्रवारी सकाळी इंदिरानगर वस्तीच्या पुढील चुंचाळे रस्त्यावरील नाल्याच्या पुलाच्या खाली त्यांचा गळा कापलेला अवस्थेत मृतदेह शेतमजुरांना दिसून आला आणि एकच खळबळ उडाली.
हे पण वाचा..
वडिलांशी गप्पा मारत असताना आला हृदयविकाराचा झटका अन्.. मृत्यूचा लाइव्ह Video समोर
दहावी उत्तीर्णांसाठी खुशखबर..! अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागात भरती
मजुरांना गावात माहिती दिल्यानंतर यावल पोलिसांना माहिती देण्यात आली. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर फैजपुर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर, पोलीस उपनिरिक्षक प्रदीप बोरूडे, पोलीस पथक हे घटनस्थळी दाखल झाले आहे.
यावेळी मृतदेहाचा पंचानामा करण्यात येत असून आरोपींच्या शोधासाठी श्वानपथक घटनास्थळी आले असून पुढील चौकशीला सुरूवात करण्यात आली आहे. या घटनेबाबत मयताचा मुलगा विनोद भिमराव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. हा खून कोणत्या कारणासाठी व कुणी केला याची माहिती अद्यापपर्यंत उपलब्ध झालेली नाही.