मुंबई (प्रतिनिधी)-वृत्तपत्र आणि पत्रकारांच्या विविध मागण्यांबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेऊन माध्यमात काम करणार्यांना दिलासा देण्याची भूमिका सरकार घेईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पत्रकारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी मुंबईत फडणवीस यांची भेट घेऊन पत्रकारांच्या प्रश्नांबाबत स्वतंत्र बैठक लावून प्रश्न सोडवावेत अशी आग्रही मागणी निवेदन देऊन केली.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर निवासस्थानी गुरुवार दि. 20 ऑक्टोंबर रोजी भेट घेऊन पत्रकारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत निवेदन दिले. कोरोना काळात राज्यात मृत पावलेल्या पत्रकारांना सरकारने मदत करावी. वृत्तपत्रांना मिळणार्या जाहिराती कमी झाल्याने आणि कागदासह इतर साहित्याचे भाव वाढल्याने वृत्तपत्र चालवणे कठीण झाले आहे.
त्यामुळे जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरावरील दैनिकांना सरकारने जाहिरातीचा दर आणि कोठा वाढवून द्यावा. तसेच वृत्तपत्र व्यवसायाला लघु उद्योजकाचा दर्जा देऊन सरकारने सवलती द्याव्यात. स्थानिक पातळीवर छोट्या वर्तमान पत्रांना अधिकच्या जाहिराती देण्याबाबत सहकारी संस्था, स्थानिक संस्थांना सुचना द्याव्यात अशी मागणी केली. फडणवीस यांनी माध्यम क्षेत्राला अधिक मजबूत करण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेईल अशी ग्वाही दिली.