एरंडोल : प्रेमाच्या जाळ्यात ओढून अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेण्याच्या घटनामध्ये वाढ होत असल्याचे दिसून येतेय. अशातच हळदीच्या कार्यक्रमासाठी आई ,वडील व भावासह गेलेल्या १३ वर्षीय मुलीस विखरण शिवारातील शेतातून फूस लावून पळवून नेल्याची घटना शनिवारी पहाटे घडली. याबाबत मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
शहरातील अनेक शेतांमध्ये मेंढपाळ कुटुंब राहण्यासाठी आले आहेत.
असेच एक कुटुंब विखरण (ता.एरंडोल) येथील तुकाराम भिला यांच्या शेतात अाहे. त्या मेंढपाळाच्या शालकाच्या मुलीचे लग्न असल्यामुळे कुटुंब हळदीच्या कार्यक्रमासाठी विखरण येथे आले होते. मध्यरात्री उशिरापर्यंत हळदीचा कार्यक्रम चालल्यानंतर सर्व सदस्य शेतातच झोपले. पहाटेच्या सुमारास मुलीच्या वडिलांना जाग आली. तेव्हा मुलगी जागेवर नव्हती.
त्यामुळे आई, वडील, भाऊ व नातेवाइकांनी तिचा परिसरात शोध घेतला असता ती आढळली नाही. अज्ञात व्यक्तीने तिला फूस लावून पळवल्याचा संशय वडिलांना आहे. अल्पवयीन मुलगी रंगाने गोरी, शरीराने सडपातळ, केस लांब, उंची पाच फूट असून तिने तपकिरी रंगाची जीन्स व पंजाबी ड्रेस परिधान केला आहे. याबाबत वडिलांच्या तक्रारीनुसार अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलिस संशयितांचा शोध घेत आहेत.