मुंबई,(प्रतिनिधी) – जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या वादात आमदार गिरीश महाजन यांना अडकवून खोटा गुन्हा दाखल करून मोक्का लावण्याचं षडयंत्र राज्य सरकार आणि विशेष सरकारी वकिल प्रविण चव्हाण यांनी रचलं असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानभवनात केला आहे आणि त्याला आमच्या पक्षातून सत्ताधारी पक्षात आलेल्या एका नेत्यानेही मदत केल्याचा धक्कादायक आणि खळबळजनक आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला असून या षडयंत्रच्या प्लॅनिंगचा व्हिडीओ असलेला एक पेनड्राईव्हच फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षांकडे यावेळी सोपाविल्याने राज्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे.
व्हिडीओतील संवादाचा काही भाग देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात वाचून दाखविला.कुणाचा काय काय संवाद आहे याची सविस्तर माहिती त्यांनी यावेळी दिली. या व्हिडीओत कोण कोण संवाद साधत आहे हेही त्यांनी सांगितलं. तसेच सरकारी वकिलाने कट कसा प्लांट करायचा, पुरावे कसे तयार करायचे, जबानी कशी नोंदवायची, साक्षीदाराने साक्ष काय द्यायची याची तयारी केल्याचंही फडणवीस यांनी विस्तृतपणे सभागृहात मांडले असून या गंभीर प्रकरणाची चौकशी सीबीआय मार्फत व्हावी अशी मागणी केली असं न झाल्यास आम्ही न्यायालयात जाऊ असा इशारा देखील फडणवीस यांनी दिला.
नेमकं काय आहे प्रकरण…
2018 मध्ये जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक संस्थेत पाटील गट आणि भोईटे गटात हा संघर्ष आहे. महाजनांचे स्वीय सहाय्यक रामेश्वर नाईक यांनी अपहरण केल्याच बनावट केस केली. त्या केसमध्ये महाजनांना मोक्का लागला पाहिजे असं सांगून मोका लावण्याचे कागदपत्रं तयार झाले. कोर्टाने महाजनांना दिलासा दिला. राज्य सरकार काय षडयंत्र करते ते सांगतो. एका कत्तलखान्याची कथा. विरोधकांची कत्तल कशी करायची हे षडयंत्र शिजतंय. विशेष सरकारी वकील प्रवीण पंडीत चव्हाण हे या षडयंत्राचे कर्ते असल्याचा थेट आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
मटेरियल इतकं की 25 वेब सिरीज बनतील…
देवेंद्र फडणवीस यांनी बोलतांना सुरवातीलाच सांगितले की ही कथा मोठी आहे. या कथेचं मटेरियल माझ्याकडे इतकं आहे की त्यावर 25 वेबसीरीज बनतील त्याचा व्हिडीओचा पेनड्राईव्ह मी दिला आहे. सरकारी वकिलांचं कार्यालय हे विरोधकांविरुद्ध षडयंत्र करण्याची जागा आहे. चाकू प्लांट करण्यापासून गळ्याला रक्त लावण्यापासून ते ड्रग्जची रेड कशी करायची? रेड प्लांट कशी करायची? हा असा गुन्हेगारी स्वरुपाचा कट वकील रचत आहे. त्यात पोलीस आणि मंत्रीही आले. हे सर्व कुभांड रचलं गेलं. एफआयआर देखील सरकारी वकिलांनी लिहून दिली. साक्षीदार सरकारी वकिलाने दिले. जबानी कशी नोंदवायची हे शिकवलं. रेड कशी करायची याची व्यवस्था केली. आमचे एक माजी नेते आता ते तुमच्या पक्षात आहे त्यांनी ही व्यवस्था केली. हॉटेल बुक केली. पैसे कसे द्यायचे हे सर्व झालं असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
माझ्याकडे सव्वाशे तासाचं रेकॉर्डिंग- फडणवीस
या सर्व प्रकरणातील माझ्याकडे सव्वाशे तासाचं रेकॉर्डिंग आहे. आता मी निवडक भाग देतो. यातील काही भाग सभागृहाची इभ्रत घालवणारं आहे ते सांगू शकत नाही, असं त्यांनी सांगितलं.
आम्हाला पैसा निलेश पुरवायचा असं सांगा…
एका व्हिडिओत महाजनांसाठी कट कसा शिजतो. आम्हाला पैसा निलेश पुरवायचा.दहशत पसवरतोय असं सांगा. ड्रग्ज देतो असं सांगितलं तर मोक्का लागेल. एका ग्रॅमला एक लाख मिळतात असे सांगायचे म्हणजे महाजनांवर मोक्का लागेल असा संवाद असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.