लखनऊ – लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर उत्तर प्रदेशातील बसप-सप युती तूर्तास तुटली आहे. राज्यातील आगामी पोटनिवडणुकांमध्ये बसप स्वबळावर लढणार आहे, अशी घोषणा मायावती यांनी आज पत्रकार परिषदेत केली.
लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी मायावतींच्या बसपनं आणि अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षानं एकत्र येण्याचा निर्णय घेतला होता. तब्बल 24 वर्षांनी दोन्ही पक्ष एकत्र आले होते. मात्र, पराभवानंतर बसप-सप युती पुन्हा तुटेल, अशी चर्चा होती. ती खरी ठरली. मायावती यांनी समाजवादी पक्षासोबत असलेली युती तूर्तास तोडली आहे. आगामी पोटनिवडणुका स्बबळावर लढणार आहे, अशी घोषणा त्यांनी आज केली. अखिलेश आणि डिंपल यादव यांच्यासोबतचं नातं कायम राहील. मात्र, राजकीय वाटचालीत स्वबळावर पुढे जाण्याचा निर्णय घेत असल्याचं मायावतींनी यावेळी जाहीर केलं. कनौजमधून डिंपल, बदायूँमध्ये धर्मेंद्र यादव आणि फिरोजाबादमध्ये अक्षय यादव यांच्या पराभवानं आम्हाला विचार करायला भाग पाडलं. त्यांच्या पराभवाचे आम्हालाही दुःख आहे. यादवांचा प्रभाव असलेल्या मतदारसंघातही यादवांची मते बसप उमेदवारांना मिळाली नाहीत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
अखिलेश आणि डिंपल माझा आदर करतात. आमचे तयार झालेले नाते कायम राहील. आम्ही समाजवादी पक्षासोबतची युती कायमस्वरूपी तोडलेली नाही. भविष्यात अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखाली समाजवादी पक्षाची कामगिरी सुधारली तर आम्ही पुन्हा एकत्र येऊ, असंही मायावती यांनी स्पष्ट केलं.