वज्रेश्वरी : भिवंडी तालुक्यातील तीर्थक्षेत्र वज्रेश्वरी परिसरात वृद्ध दाम्पत्याची गळा चिरून हत्या केल्याने खळबळ उडाली. हे वृद्ध दाम्पत्य घरात दोघेच राहायचे. मध्यरात्री या दोघांची हत्या केली. हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात मारेकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
भिवंडी तालुक्यातील तीर्थक्षेत्र वज्रेश्वरी येथील अकलोली परिसरातील पेंढारपाडा येथे एका घरात वृद्ध पती-पत्नी राहत होते. त्या दोघांचीही धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केली. जगन्नाथ (बाळा) पाटील (वय ८३) आणि सत्यभामा पाटील (वय ७५) अशी दोघांची नावे आहेत. घराचा दरवाजा खुला असल्यामुळे आजूबाजूच्या रहिवाशांना संशय आला. त्यांनी पाहणी केली असता, दोघेही रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडलेले होते. त्यांनी तात्काळ ही माहिती पोलिसांना दिली. भिवंडीतील गणेशपुरी पोलिसांनी माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा केल्यानंतर अज्ञात मारेकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला. या वृद्ध दाम्पत्याची निर्घृण हत्या का केली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. वृद्ध महिलेच्या अंगावरील दागिने तसेच होते. विशेष म्हणजे, ही घटना उघड झाली त्यावेळी घरातील टीव्ही सुरूच होता. चोरीच्या उद्देशाने दरोडेखोर किंवा चोरट्यांनी ही हत्या केली नसून, ओळखीच्या व्यक्तीनेच हे कृत्य केले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून, त्या दिशेने तपास सुरू आहे.