जामनेर प्रतिनिधी । गाईचा गोठा शेडचे बांधणीचे प्रकरण मंजूर झाल्यानंतर शेड काम सुरू करण्यासाठी लागणारी वर्क ऑर्डर मिळवून देण्याच्या मोबदल्यात तीन हजारांची लाच मागून ती स्वीकारताना जामनेर पंचायत समितीमधील कनिष्ठ लिपिक वसंत पंडीत बारी (53,रा.शेंदुर्णी, ता.जामनेर) जाळ्यात अडकला. लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाने आज सकाळी रंगेहात अटक केली. या कारवाईमुळे लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.
याबाबत असे की, तक्रारदार हे जामनेर तालुक्यातील शेवगे पिंप्री येथील रहिवाशी आहेत. तक्रारदार यांचे गाईचा गोठा शेडचे बांधणीचे प्रकरणी मंजुर झालेले असून गोठ्याचे शेडच्या बांधणीचे काम सुरू करण्यासाठी लागणारी वर्क ऑर्डर मिळवून देण्याच्या मोबदल्यात पंचायत समितीचे कनिष्ठ लिपीक वसंत पंडीत बारी (वय-५३) रा. शेंदुर्णी ता. जामनेर याने तीन हजार रूपयोची मागणी ११ जानेवारी रोजी केली होती. दरम्यान तक्रारदार यांनी जळगाव लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीनुसार लाचलुचपत विभागाने गुरूवार १३ जानेवारी रोजी सकाळी सापळा रचुन लोकसेवक कनिष्ठ लिपीत वसंत बारी याला पंचायत समिती कार्यालयात तीन हजार रूपयांची लाच घेतांना अटक केली आहे.
यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा नाशिक एसीबीचे पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलिस अधीक्षक एन.एस.न्याहळदे, पोलिस उपअधीक्षक सतीश डी.भामरे (वाचक) यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक शशीकांत श्रीराम पाटील, पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव, एएसआय दिनेशसिंग पाटील, एएसआय सुरेश पाटील, हवालदार अशोक अहिरे, हवालदार सुनील पाटील, हवालदार रवींद्र घुगे, हवालदार शैला धनगर, पोलिस नाईक मनोज जोशी, नाईक सुनील शिरसाठ, नाईक जनार्धन चौधरी, कॉन्स्टेबल प्रवीण पाटील, कॉन्स्टेबल महेश सोमवंशी, कॉन्स्टेबल नासीर देशमुख, कॉन्स्टेबल ईश्वर धनगर, कॉन्स्टेबल प्रदीप पोळ आदींच्या पथकाने यशस्वी केला.