मुंबई: कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनमुळे राज्यात भीतीचे वातावरण आहे. ओमायक्रॉनमुळे कोरोनाची रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असल्याने राज्य सरकारची चिंता वाढली आहे. दरम्यान कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी खबरदारी घेतली जात असून लसीकरण मोहीम देखील वेगाने सुरू आहे.राज्यात 15 ते 18 वयोगटातील 60 लाख मुलांचं लसीकरण करायचं आहे. मुलांनी कोरोना लस घेतली नाहीतर पिझ्झा बर्गर देखील मिळणार नाही, असं आवाहन राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले.
15 ते 18 वयोगटातील मुलांचं लसीकरण वेगानं करत आहोत. राज्यातील 60 लाख मुलांचं लसीकरण करायचं आहे. दररोज 3 लाख मुलांचं लसीकरण याप्रमाणं प्रयत्न करत आहोत. 15 ते 20 दिवसांमध्ये हे लसीकरण होऊन जाईल. किशोरवयीन मुलांना स्वत: सुरक्षित राहायचं असेल तर कुठं जायचं असेल तर लसीकरण करुन घ्या. बर्गर आणि पिझ्झा घ्यायचा असला तरी लस बंधनकारक त्यामुळं लसीकरण करुन घ्या, असं आवाहन राजेश टोपे यांनी किशोरवयीन मुलांना केलं.
राज्यात पूर्ण लॉकडाऊन लागणार का?
राजेश टोपे : आम्ही स्पष्टपणे ठरवलेलं आहे की 700 मेट्रिक टन ऑक्सिजन लागेल किंवा 40 टक्के बेड वापरले जातील त्यावेळी लॉकडाऊन लागेल. मात्र, सध्या तशी परिस्थिती नाही. राज्यातील रुग्णालयातील 10 ते 15 टक्के बेड व्यापलेले आहेत. राज्यातील मृत्यूदर वाढलेला नाही. त्यामुळं घाबरण्याची गरज नाही, पण काळजी घेतली पाहिजे. ज्येष्ठ नागरिक, कोमॉर्बिड लोकांनी काळजी घेणं गरजेचं आहे. कोरोना प्रसार रोखण्यासाठी निर्बंध लावलेले आहेत. त्यामुळं आपण नियम पाळले नाहीत तर अवघड आहे. रात्री फिरण्याची गरज नाही. मुंबई सारख्या शहरात रात्री 11 ते 5 या वेळेत काही निर्बंध लावता येते का हे पाहावं लागेल, असं राजेश टोपे म्हणाले.















