जळगाव प्रतिनिधी | जळगाव आरटीओ कार्यालयातील एक विचित्र कारभार समोर आला आहे. परिवहनमंत्री अनिल परब यांच्या नावावर भुसावळ मतदारसंघाचे आमदार संजय सावकारे यांच्या मालकीची गाड़ी ट्रान्सफर करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. या प्रकारची चौकशी करण्यासाठी आ. सावकारे यांनी आरटीओ कार्यालय गाठत उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांच्याकडे तक्रार केली आहे.
भुसावळचे आमदार संजय सावकारे यांच्या मालकीची टोयोटा कंपनीची( गाडी क्र. एमएच १९ – सी झेड -५१३० ) ही गाडी अन्य कुणालाही विक्री केली नसतानाही २४ डिसेंबर २०२१ रोजी परस्पर ट्रान्सफर करून परिवहन मंत्री अनिल दत्तात्रय परब यांच्या नावे केल्याची माहिती उघडकीस आली आहे. यात कागदपत्रे देखील तशी केल्याचे प्रथमदर्शनी दिसत असून याची चौकशी चालू आहे.
दरम्यान, आमदार सावकारेंनी ही गाडी विक्री केली नसतांनाही मंत्री परब यांच्या नावाने नोंदणी कशी झाली याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. याप्रकारातून आरटीओ कार्यालयाचा गलथानपणा पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.या पूर्वी देखील जळगाव आरटीओ कार्यालयातून मंत्र्यांच्या नावाने लायसन्स दिले गेले असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता असे असतांनाही आतातर चक्क आमदारांच्या मालकीची गाडी जळगाव आरटीओ कार्यालयात परिवहनमंत्री अनिल परब यांच्या नावावर ट्रान्सफर करुन नोंदणी केली गेली आहे. पहिल्या गाडी मालकाकडून दुसऱ्याच्या नावावर गाडीची नोंद करण्यासाठी प्रत्यक्ष आरटीओ कार्यालयात जावे लागते. अनिल परब यांच्या नावावर नोंदणी केली तर , ते प्रत्यक्ष आले होते का ? ते जर आले नाही तर त्यांच्या नावावर गाडी ट्रान्सफर होवून नोंदणी झाली कशी ? किंवा पहिल्या गाडी मालकाने गाड़ीसाठी कर्ज घेतले असेल तर त्याची एनओसी घेतली होती का ? असे नानाविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत.