मुंबई-कोकणकन्या एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वेची लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे. ऐन कार्यालयीन वेळेत हा प्रकार घडल्यानं प्रवाशांची चांगलीच गोची झाली आहे. बिघाड दुरुस्त होईपर्यंत प्रवाशांना हा मनस्ताप सहन करावा लागणार आहे.
छत्रपती शिवाजी टर्मीनसकडे येणाऱ्या कोकणकन्या एक्स्प्रेसच्या इंजिनात अचानक बिघाड झाला आहे. त्यामुळं ही गाडी जागीच उभी आहे. त्यामागे जलद लोकल खोळंबल्या आहेत. यामुळे सीएसएमटी ते मशीद स्थानकांदरम्यान जलद मार्गावर लोकलच्या रांगा लागल्या आहेत. सीएसएमटीकडे येणाऱ्या प्रवाशांना रुळांवरून चालत रेल्वे स्थानक गाठावे लागत आहे. इंजिनातील बिघाड दुरुस्त होण्यासाठी आणखी काही वेळ लागणार असल्यानं अप जलद मार्गावरील लोकल उशिरानं धावणार आहेत.