जामनेर : तालुक्यातील सामरोद येथील २३ वर्षीय तरूण शेतकऱ्याने नापिकी व कर्जाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिवाळीच्या दिवशी उघडकीस आली. योगेश सदाशीव धुंदाळे (वय २५) असे आत्महत्या केलेल्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे.
सामराेद येथील सदाशिव निना धुंदाळे यांचे वय ६० वर्ष यांचा मुलगा योगेश धुंदाळे या तरूण शेतकऱ्याने दिवाळीच्या दिवशी स्वत:च्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. योगेश याच्यावडिलांकडून शेतीची कामे होत नाहीत. त्यामुळे काही वर्षांपासून योगेश स्वत: शेती करून कुटुंबाचा गाळा चालवत होता.
मात्र, यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतातील पिकाचे प्रचंड प्रमाणावर नुकसान झाले हाेते, तर लागलेला खर्चही निघणार नाही. अशावेळी पुढील काळात घराचा रहाट-गाडा कसा चालवावा, या विवंचनेत असलेल्या योगेश धुंदाळे हे गुरुवारी सकाळी बैलगाडी घेऊन शेतात गेले. तेथेच नैराश्येतून गळफास घेत त्यांनी आत्महत्या केली. बराच वेळ होऊनही योगेश हे जेवणासाठी घरी आले नाही. त्यामुळे योगेशला बोलावण्यासाठी गेले असता त्यांचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहिण असा परिवार आहे.